लातूर -बोगस शालार्थ आयडी सहित खाजगी शैक्षणिक संस्थामध्ये झालेल्या घोटाळ्यांची तपासणी करण्यासाठी लातूर मध्ये एस आय टी ने तपासणी केली आहे. तत्पूर्वी अनेक संस्थाचालकांनी शिक्षण विभागात सेटिंग करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिक्षक भरती, वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आयडीसंदर्भातील कथित गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील शिक्षण विभागात पुन्हा एकदा चौकशीची धावपळ सुरू झाली आहे. विशेष तपासणी पथक अर्थात एसआयटी लातूरमध्ये दाखल झाले असून, शिक्षक भरती आणि वैयक्तिक मान्यता प्रकरणांच्या मुळाशी जाण्याची तयारी सुरू आहे.
माध्यमिक शिक्षण विभागाने तब्बल १ हजार ३७८ संचिका उपसंचालक कार्यालयात जमा केल्याची माहिती समोर आली आहे. या संचिकांची तपासणी करण्यात येणार असून, प्राथमिक शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांकडूनही संबंधित फायलींचे वर्गीकरण सुरू आहे.
या तपासणीत नियुक्तीशी संबंधित कागदपत्रे, वैयक्तिक मान्यता, शालार्थ मान्यता, सेवासातत्य, पदांची उपलब्धता तसेच नियुक्तीची प्रक्रिया नियमांनुसार झाली होती का, याची पडताळणी होण्याची शक्यता आहे.
लातूर जिल्ह्यातील शिक्षण विभागातील गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी विशेष तपासणी पथक (SIT) दाखल झाले आहे. यापूर्वीही एका समितीने लातूरमध्ये सुमारे २० दिवस तपासणी केली होती. आता पुन्हा चौकशी सुरू झाल्याने शिक्षण विभागातील संबंधित प्रकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्याचे शिक्षण संचालकही लातूर जिल्ह्यात दाखल झाले असून, शाळांची पाहणी, शिक्षक-विद्यार्थी उपस्थिती, रिक्त पदे आणि निधी वापराचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच २०१९ पासूनच्या वैयक्तिक मान्यता आणि नियुक्ती प्रकरणांची तपासणी केली जाणार आहे.
चौकशीच्या पार्श्वभूमीवर रात्री उशिरापर्यंत पथकाने शिक्षण मंडळात बसून फायली तपासल्याचे वृत्त आहे. त्यानंतर दीड हजारांहून अधिक फायली रात्री उशिरा जिल्हा परिषद कार्यालयाकडे हलवण्यात आल्याचेही समोर आले आहे.
या घडामोडींमुळे प्रशासनिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मात्र, फायली हलविण्याच्या प्रक्रियेमागे नेमके कारण काय होते, याबाबत अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही. त्यामुळे केवळ या हालचालींवरून गैरप्रकार सिद्ध झाला असे म्हणता येणार नाही.
एसआयटीच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर काही संस्थाचालकांचे प्रतिनिधी रात्री उशिरापर्यंत कार्यालयात येऊन संबंधित फायलींमध्ये राहिलेल्या त्रुटींची कागदपत्रे जोडणे आणि नोंदी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.त्यामुळे चौकशीपूर्वीच फायली ‘दुरुस्त’ करण्याचा प्रयत्न होत आहे का? असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
एसआयटीच्या चौकशीच्या कक्षेत साधारणपणे पुढील बाबी येत असल्याचे उपलब्ध वृत्तांतून दिसते.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडी मंजुरी,सेवासातत्याची प्रकरणे,विनाअनुदानितवरून अनुदानित पदावर झालेल्या बदल्या, नियुक्तीच्या वेळी पद अस्तित्वात होते का?नियुक्तीची प्रक्रिया शासनाच्या नियमांनुसार झाली का?संबंधित कागदपत्रे आणि कार्यालयीन नोंदी खरी आहेत का?याची चौकशी केली जाणार आहे.
राज्यस्तरीय एसआयटीला अनुदानित व अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील अशा प्रकरणांची तपासणी करण्याचे काम देण्यात आले आहे.
शिक्षक भरती आणि शालार्थ आयडीतील कथित गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर राज्यात यापूर्वीच एसआयटी स्थापन करण्यात आली होती. २०१२ पासूनच्या प्रकरणांची तपासणी करण्याचे निर्देश या चौकशीला देण्यात आले होते. त्यामध्ये वैयक्तिक मान्यता, शालार्थ मान्यता, सेवासातत्य आणि अनुदानित पदांवरील बदल्यांसारख्या बाबींचा समावेश आहे.




Leave a Reply