बीड -बीड जिल्ह्यातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था किंवा चंपावती शिक्षण संस्थाच नव्हे तर सगळीकडेच घोटाळे असल्याचे समोर येतं आहे. बीडचे माजी शिक्षणाधिकारी ज्ञानोबा सोनवणे यांच्या संस्थेत तर कुटूंब कबीलाच्या हातात सगळा कारभार आहे. ज्ञानोबा सोनवणे स्वतः आदर्श महाराष्ट्र बहुउद्देशीय संस्थेचे सचिव आहेत तर मोठा मुलगा अध्यक्ष, दुसरा मुलगा कोषाध्यक्ष आणि भाऊ सदस्य तर सुनबाई प्रिन्सिपल आहेत. या संस्थेत सगळे नातेवाईक बोगस पद्धतीने भरण्यात आले आहेत. याची चौकशी होण्याची गरज आहे.
नागपूर, अमरावती, नाशिक, जळगाव या जिल्ह्यात बोगस शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आल्यानंतर सरकारने राज्यस्तरीय एस आय टी ची घोषणा केली. या नंतर राज्यभरातील संस्थाचालक हादरून गेले.
बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस शिक्षक भरती झाल्याच्या तक्रारी आहेत. भारतीय शिक्षण प्रसारक संस्था आणि चंपावती संस्थेची चौकशी करण्याचे आदेश उपसंचालक यांनी दिले असून त्रिस्तरीय समिती देखील स्थापन केली आहे.
अशातच आता आदर्श महाराष्ट्र बहुउद्देशीय संस्थेत मोठ्या प्रमाणात घोटाळे असल्याचे समोर आले आहे. या संस्थेचे सचिव माजी शिक्षणाधिकारी ज्ञानोबा सोनवणे हे आहेत तर त्याचे जेष्ठ चिरंजीव राजेश सोनवणे अध्यक्ष आहेत, दुसरे चिरंजीव डॉ सतिश सोनवणे हे कोषाध्यक्ष आहेत तर सुनबाई कल्पना कुटे सोनवणे या प्राचार्य आहेत, तसेच ज्ञानोबा सोनवणे यांचे तिसरे चिरंजीव डॉ भक्तराज सोनवणे हे सदस्य आहेत.
एकाच घरात संस्थेची सगळी पदे वाटून घेण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष असलेले राजेश सोनवणे हे प्राध्यापक म्हणून देखील नोकरीस आहेत. म्हणजेच आपलीच संस्था अन आपणच नोकरीला असा प्रकार या ठिकाणी सुरु आहे.
विशेष बाब म्हणजे हे माजी उपशिक्षणाधिकारी तथा माजी शिक्षणाधिकारी असणारे सोनवणे महाशय संस्थेतील इतर शिक्षक, प्राध्यापक आणि कर्मचारी यांची मात्र प्रचंड आर्थिक पिळवणूक करतात. या संस्थेत त्यांचा मुलगा असो किंवा सुनाबाई असोत यांची नियुक्ती बोगस पद्धतीने झालेली आहे.
या बोगस भरती बद्दल कोणी तक्रार केली तर त्या तक्रारदाराला मॅनेज करायचे किंवा ब्लॅकमेल करायचे असे उद्योग हे सोनवणे महाशय करतात. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एस आय टी कडे सविस्तर तक्रार करण्यात आली आहे.




Leave a Reply Cancel reply