पुणे –नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टाने आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा ठोठावली आहे. अवघ्या दोन महिन्यात या खटल्याचा तपास आणि निकाल आल्याने पीडित कुटुंबाने समाधान व्यक्त केले आहे.
६५ वर्षीय भीमराव कांबळे याने काही दिवसांपूर्वी एका साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला होता. त्याने पीडितेला खाऊ देण्याचं आमिष दाखवून तिला घेऊन गेला. एका गोठ्यात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यानंतर त्याने पीडितेचा गळा आवळून खून केला. शवविच्छेदन अहवालात चिमुकलीच्या शरीरावर तब्बल १९ जखमा आढळल्या होत्या.एवढंच नव्हे तर चिमुकलीचा जीव गेल्यानंतरही आरोपी तिच्यावर अत्याचार करत होता, असं स्पष्ट झालं होतं. याबाबतचे काही सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले होते. ज्यात नराधम चिमुकलीला घेऊन जात असल्याचं दिसून आलं होतं.
तीन दिवसापूर्वी न्यायालयाने कांबळे दोषी असल्याचे स्पष्ट केले होते. आता या प्रकरणी कोर्टाने आरोपीला शिक्षा सुनावली आहे. भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे.
यावेळी न्यायाधीश एस आर साळुंखे यांनी या प्रकरणाला रेअरेस्ट ऑफ रेअरेस्ट प्रकरण असल्याचं म्हटलं. यावेळी कोर्टाने दोषी भीमराव कांबळेच्या कृत्यांवर तीव्र आक्षेप नोंदवले. आरोपीला गुन्ह्याचा पश्चाताप झालेला दिसत नाही. हा गुन्हा मृत्यूदंड देण्यास पात्र ठरतोय. या प्रकरणात आरोपीविरोधात सबळ पुरावे आहे. त्याने 3 वर्षांच्या मुलीसोबत केलेलं कृत्य अत्यंत निर्दयी आहे. त्याच्यावर दया दाखवावी, असं एकही कारण नाही. आरोपीला फाशीची शिक्षाही अपुरी, पण यापेक्षा मोठी शिक्षा नाही. त्यामुळे दोषीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी, असं कोर्टानं म्हटलं.
हा निकाल वाचून झाल्यानंतर न्यायमूर्ती एस आर साळुंखे यांनी दोषी भीमराव कांबळेला उद्देशून एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. ‘आता फासावर चढा’ असं त्यांनी म्हटलं. या निकाल वाचत असताना कांबळेनं काहीच रिअॅक्शन दिली नाही. तो कोर्टात खाली मान घालून उभा होता. सर्व निकाल तो ऐकत होता.
हा निकाल लागताच पीडित चिमुकलीच्या आई वडिलांना अश्रू अनावर झाले. आपल्या मुलीला न्याय मिळावा, यासाठी पीडितेचे आई वडील पहिल्या दिवसांपासून प्रयत्न करत होते. या प्रकरणी जेव्हा पुण्यासह राज्यात विविध ठिकाणी निदर्शने झाली, तेव्हा देखील पीडितेचं कुटुंबीय थेट आंदोलनात होते. आता अखेर त्यांच्या मुलीला न्याय मिळाला. मात्र हा निकाल ऐकून त्यांना अश्रू रोखता आले नाहीत. ते बराच वेळ कोर्टात धाय मोकलून रडत होते.
न्यायाधीश एस आर साळुंखे यांनी निकाल वाचून दाखवला. १३७ पानांच्या निकालपत्रात कोर्टाने इतरही विविध केसेसचा दाखला दिला. यावेळी १२ प्रकरणांची मांडणी करण्यात आली. याची ऑर्डर कॉपी देखील निकालात जोडली आहे. बच्चनसिंह केस, अशरफ अली केस, वसंत धुपारे विरुद्ध महाराष्ट्र सरकार अशा केसेसचा उल्लेख कोर्टात करण्यात आला. न्यायाधीशांनी नसरापूर प्रकरणाचा उल्लेख रेअरेस्ट ऑफ रेअरेस्ट असा केला असून या प्रकरणी लोकांमध्ये प्रचंड रोष असल्याचं सांगितलं आहे. तसेच आरोपी समाजात वावरण्याच्या लायकीचा नाही, असं निरीक्षणही कोर्टानं नोंदवलं.
२६ तारखेला झालेल्या सुनावणीत कोर्टाने आरोपी भीमराव कांबळे याला कोणती शिक्षा द्यावी, अशी विचारणा केली होती. तेव्हा आरोपीनं स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र परिस्थितीजन्य सर्व पुरावे आरोपी कांबळेच्या विरोधात होते. आपण तिला घेऊन जात असताना घसरून पडलो, यात तिचा मृत्यू झाल्याचं तो सांगत होता. मात्र कोर्टाने त्याचा दावा फेटाळून लावला.





Leave a Reply