बीड -नगरपालिका निवडणुकीत दुसऱ्याच कुटुंबाचे पुरावे जोडून जातं प्रमाणपत्र सादर करणाऱ्या रेखा सरोदे यांचे जातं वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा मोठा धक्का मानला जातं आहे.
नगरपरिषद निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक १ मधून मागास महिला प्रवर्ग आरक्षित जागेवर रेखा सरोदे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. मात्र, त्यांनी निवडणुकीसाठी सादर केलेले कुणबी जात प्रमाणपत्र खोटे आणि चुकीच्या पुराव्यांच्या आधारे मिळवले असल्याचा आक्षेप सुमन मुंडे यांनी घेतला होता. मुंडे यांनी यासंदर्भात थेट जिल्हा जात पडताळणी समितीकडे रीतसर तक्रार दाखल करून पुराव्यांसह आव्हान दिले होते. या तक्रारीनंतर समितीने दोन्ही बाजूंचे म्हणणे आणि कागदपत्रांची कसून पडताळणी केली.
जात पडताळणी समितीच्या चौकशीत रेखा सरोदे यांच्या जातीबाबतचे अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. सरोदे यांच्या खळवट लिमगाव येथील मूळ शालेय उताऱ्याची तपासणी केली असता, त्यावर केवळ ‘हिंदू’ किंवा ‘हिंदू मराठा’ अशी नोंद आढळून आली. संपूर्ण शालेय रेकॉर्डमध्ये कुठेही ‘कुणबी’ असा उल्लेख नव्हता.
शालेय उताऱ्यावर कुणबी नोंद नसल्यामुळे रेखा सरोदे यांनी आपली कुणबी जात सिद्ध करण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली होती. त्यांनी त्यांच्या गावापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कुप्पा गावचे रहिवासी ‘यशवंत संभाजी’ नावाच्या व्यक्तीला आपले ‘खापर पंजोबा’ दाखवले आणि त्यांच्या जुन्या कुणबी नोंदीचा गैरफायदा घेत स्वतःचा कुणबी दाखला पदरात पाडून घेतला.
समितीने जेव्हा सखोल तपास केला, तेव्हा उघड झाले की, यशवंत संभाजी हे प्रत्यक्षात तिथल्या स्थानिक ‘सावंत’ आडनावाच्या कुटुंबाचे पूर्वज आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, याच यशवंत संभाजी यांच्या पुराव्यांच्या आधारावर पृथ्वीराज दादासाहेब सावंत यांना आधीच जात वैधता प्रमाणपत्र (Validity) मिळालेले आहे. त्यामुळे सरोदे यांनी दुसऱ्याच कुटुंबाच्या पूर्वजांचा पूर्वग्रहदूषित वापर केल्याचे सिद्ध झाले.
शालेय रेकॉर्डमधील तफावत आणि चुकीच्या व्यक्तीला पूर्वज दाखवून मिळवलेला कुणबी दाखला यामुळे जिल्हा जात पडताळणी समितीने रेखा सरोदे यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवून ते जप्त केले आहे. या प्रकरणी तक्रारदाराच्या वतीने ऍड विकास मिसाळ यांनी काम पाहिले त्यांना ऍड दीपक कुलकर्णी यांनी सहकार्य केले.





Leave a Reply