बीड -घरकुल लाभार्थ्यांना वाळू वाटप करण्याच्या नावाखाली गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे आणि इतरांनी तब्बल वीस हजार ब्रास पेक्षा जास्तच वाळूचा अवैध उपसा केल्याचे स्पष्ट झाले आहे. खोमणेच्या कलेक्शन वाल्या लोकांनी आता घरकुल मंजूर झालेल्या लोकांना मॅनेज करण्याची धडपड सुरु केली आहे. सर्व दहा पथकांचे अहवाल प्राप्त होताच तहसीलदार यांच्यासह लाभार्थ्यांवर देखील कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथून तहसीलदार संदीप खोमणे, मंडळ अधिकारी चांदणे आणि तलाठी ढाकणे यांच्यासह काही बगलबच्यांनी घरकुल लाभार्थ्यांना वाळू वाटप करण्याच्या नावाखाली हजारो ब्रास वाळूचा उपसा केला. याबाबत न्यूज अँड व्यूज ने वृत्त प्रकाशित केले होते.
गेवराई चे आ विजयसिंह पंडित यांनी पत्रकार परिषद घेऊन खोमणे यांनी शंभर कोटीची वाळू उपसल्याचा खळबळजनक आरोप केला होता. तसेच या सर्व प्रकरणाची एस आय टी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती.
तहसीलदार खोमणे यांच्या सोबत बीड, गेवराई, जालना, छत्रपती संभाजीनगर येथील शेकडो हायवा चालकांनी आपल्या वाहनातून घरकुल च्या नावाखाली वाळू वाहतूक केली आहे. या सर्व हायवा ची माहिती जिल्हाधिकारी यांनी आर टी ओ ऑफिस आणि टोल नाक्यावरून गोळा करून त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे.
त्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांनी गोदापत्रात जाऊन अवैध वाळू उपसा करणाऱ्या सात हायवा वर कारवाई केली होती. तसेच दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केकी. तसेच ड्रोन द्वारे मोजणी केली.
तहसीलदार खोमणे यांच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी दहा पथक नियुक्त केले होते. ज्या ज्या लाभार्थ्यांच्या नावावर वाळू वाटप झाली आहे, त्यांची घरी जाऊन चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते.
त्यानुसार भूमिअभिलेख विभागाने केलेल्या ए टी एस मोजणीत राक्षसभुवन येथील गणपती पॉईंट येथून तब्बल वीस हजार ब्रास पेक्षा जास्तच वाळू उपसा झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच केवळ 25 टक्के लाभार्थ्यांना वाळू पोहच झाल्याचे आणि 75 टक्के लाभार्थ्यांच्या नावावर उपसा केलेली वाळू दुसरीकडे विक्री झाल्याचे समोर आले.
आ पंडित यांच्या पत्रकार परिषदनंतर आणि जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी चौकशी सुरु केल्यानंतर खोमणे, चांदणे आणि ढाकणे यांनी घरकुल लाभार्थ्यांना मॅनेज करण्याचा प्रयत्न केला. काहींच्या घरासमोर एक ब्रास वाळू नेऊन टाकली तर काहींना फोन करून वाळू मिळाली असल्याचे सांगावे असे निरोप देण्यात आले.
जिल्हाधिकारी यांच्या चौकशीच्या आदेशानंतर सात पथकांचा अहवाल प्राप्त झाला आहे. उर्वरित तीन पथकांचा अहवाल आल्यानंतर वाळू चोरी करणारे तहसीलदार खोमणे आणि इतरांवर कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.





Leave a Reply