विशेष संपादकीय -लक्ष्मीकांत रुईकर!
बारा वर्षांपूर्वीची 3 जून ची ती सकाळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील मुंडे प्रेमींच्या काळजाचा ठोका चुकवणारी ठरली. महाराष्ट्राचा ढाण्या वाघ लोकनेता अपघातात गमावला गेला आणि संपूर्ण महाराष्ट्र शोक सागरात बुडाला. तब्बल बारा वर्षे झाले तरी देखील मुंडे प्रेमींच्या डोळ्यातील अश्रू थांबलेले नाहीत. एखादा चमत्कार होईल आणि आपले लाडके मुंडे साहेब परत येतील हा विश्वास आजही कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. गोपीनाथ मुंडे आज हयात नसले तरी त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी जडणघडणीसाठी सामाजिक आणि राजकीय शुद्धीकरणासाठी जे काही कार्य करून ठेवले आहे त्यामुळे शतकानुशतके गोपीनाथराव सदैव स्मरणात राहतील हे नक्की.
वसंत दादा पाटील, शंकरराव चव्हाण, यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्यासारख्या असंख्य नेत्यांनी महाराष्ट्राची ओळख देशातच नव्हे तर विदेशात देखील निर्माण केली.ज्याकाळी महाराष्ट्रात काँग्रेस शिवाय दुसरा पक्ष तग धरू शकत नव्हता त्याकाळी गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन या बीड जिल्ह्यातील दोन सुपुत्रांनी काँग्रेसच्या विरोधात संघर्ष सुरू केला आणि पंधरा-वीस वर्षे संघर्ष केल्यानंतर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता निर्माण करण्यात त्यांना यश आलं. यामध्ये वाडी वस्ती तांड्यावर जाऊन पक्ष आणि विचार पोहोचवण्याचं काम केलं त्यांचं नाव होतं गोपीनाथ मुंडे .

सर्वसामान्य घरातून आलेल्या या माणसाला कुठलाही राजकीय वारसा नव्हता मात्र थेट लोकांचे प्रश्न त्यांची जाण आणि लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठीची तळमळ त्यांच्याकडे होती म्हणूनच 80 पासून ते 2014 पर्यंत गोपीनाथ रावांनी पराभवाचे तोंड कधीच पाहिलं नाही. 1995 ते 99 या चार साडेचार वर्षाच्या काळात मुंडे सत्ताधारी बनले मात्र सत्तेत असोत की विरोधात त्यांनी कायमच आपल्या भोवती एक वलय निर्माण केलं होतं.
संघर्ष यात्रा असो किंवा गोदावरी परिक्रमा या माध्यमातून त्यांनी झोपडीत राहणाऱ्या दीनदलित दुबळ्यांचे अश्रू पुसण्याचे काम केलं होतं सर्वसामान्य माणसाचा आवाज म्हणून सत्ताधाऱ्यांच्या सत्तेला हादरे देण्याचे काम गोपीनाथ मुंडेंनी हयात भर केलं त्याचाच फळ म्हणून त्यांना मोदी सरकारमध्ये थेट केंद्रीय मंत्री पद मिळालं मात्र म्हणतात ना जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला या पद्धतीने नियतीला कदाचित या नेत्याची लोकप्रियता आणि त्याचा मोठेपण मान्य नव्हतं त्यामुळेच काळाने घाला घातला आणि गोपीनाथ मुंडेंचा सारखा एक लढवय्या लोकनेता हिरावून घेतला गेला.

गोपीनाथ मुंडे जेव्हा जेव्हा बीड जिल्ह्यात यायचे तेव्हा ते आवर्जून पत्रकार परिषद घ्यायचे पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारायचे कदाचित मी एकमेव पत्रकार असेल ज्याच्या सोबत पत्रकार परिषदेत मुंडे यांचे अनेक वेळा मतभेद झाले मात्र मनभेद कधीच झाले नाहीत अनेक केंद्रीय आणि राज्य पातळीवरच्या प्रश्नावर मुंडेंना मी अडचणीत आणण्याचा प्रयत्न करायचो आणि मुंडे देखील तेवढ्याच खुमासदार पद्धतीने त्या प्रश्नांना कधी उत्तर देत तर कधी बगल देत वेळ मारून द्यायचे मात्र या नेत्याने कधीच मनात आकस ठेवून वागण्याचा प्रयत्न केला नाही पत्रकार परिषद संपली की खांद्यावर हात ठेवून फारच तिखट प्रश्न विचारतोस पण आवडतं मला असं म्हणून मुंडे हसत हसत निघून जायचे आजही एखाद्या नेत्याचे पत्रकार परिषद असली की मुंडे यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

गोदावरी नदीला आलेल्या महापुरानंतर गोपीनाथ मुंडे यांनी गोदापरीक्रमेचे आयोजन केले होते संपूर्ण गोदावरी नदीकाठची गाव मुंडे मिळेल त्या वाहनाने बैलगाडीतून किंवा पायी पायी फिरले आणि त्यांनी शेतकरी शेतमजूर सर्वसामान्यांचे अश्रू पुसत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला दुष्काळाच्या काळात जनावरांच्या छावणीत मुक्काम करून तेथील शेतकऱ्यांच्या शिळ्या भाकरीचे तुकडे आनंदाने खाणारा हा नेता होता.
शेतकऱ्यासाठी उसावरील झोन बंदी उठवण्याचा निर्णय गोपीनाथ मुंडे यांनीच घ्यायला भाग पाडले त्यामुळे आजही ऊस उत्पादक आणि ऊसतोड कामगार दोघेही या नेत्याचे नाव घेताच भावनिक होतात. काँग्रेसचा आर्थिक कणा म्हणजे सहकार क्षेत्र हे लक्षात आल्यानंतर गोपीनाथ मुंडेंनी अटलजींच्या तेरा दिवसाच्या काळात महाराष्ट्रात 30 पेक्षा अधिक साखर कारखाने उभा करण्याचा संकल्प केला आणि ते यशस्वीपणे उभा देखील केले. या माध्यमातून ऊसतोड कामगाराच्या हातातील कोयता बाजूला काढत त्याला ऊसतोड बागायतदार करण्याचे काम मुंडेंनी केलं.

आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त केवळ बीड जिल्ह्यातील त्यांच्यावर प्रेम करणारे लोकच नाही तर तमाम महाराष्ट्रातील जनता त्यांच्या आठवणीने व्याकुळ झालेली आहे त्यांच्या पश्चात मंत्री पंकजा मुंडे आणि माजी खासदार प्रीतम मुंडे या त्यांचा वारसा जपण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र त्यांनाही पदोपदी आपल्या बाबांची आठवण येतेच अन डोळ्यांच्या कडा पानावतात. मुंडेनी लोकसेवेचा जो वसा आणि वारसा पंकजा मुंडेंच्या पदरात घातला आहे तो त्या यशस्वी पणे पुढे नेतील यात शंका नाही. सामान्य माणसासाठी असामान्य कार्य करणाऱ्या या लोकनेत्याला विनम्र अभिवादन.





Leave a Reply