गेवराई – प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू वाटप करण्याच्या नावाखाली गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे मंडळ अधिकारी चांदणे आणि तलाठी ढाकणे आणि त्यांच्या बगलबच्चांनी राक्षस भुवन नदीपात्राची अक्षरशः चाळणी केली आहे. लाभार्थ्याला तीन हजार तहसीलदारांना सहा हजार आणि भरायचे 3000 याप्रमाणे 12 हजारात एक हायवा याप्रमाणे शेकडो हायवा बीड जिल्ह्याच्या बाहेर पाठवण्यासाठी खोमणे अँड कंपनी घरकुलाचे नाटक करत आहेत असे आरोप स्थानिकांनी केले आहेत.
गेवराई तालुक्यात गोदाकाठ वर मोठ्या प्रमाणात वाळू माफियांनी हैदोस घातला आहे अक्षरशः चाळीस चाळीस फूट खोल खड्डे खोदून वाळूचा बेसुमार उपसा सुरू आहे. दोन्ही पंडितांसोबत हात मिळवणी करत प्रशासनाने विशेषतः तहसीलदार संदीप खोमणे यांनी गोदावरी नदीपात्रावर दरोडा घालण्याचे लायसन वाळू माफीयांना दिले आहे की काय अशी शंका येऊ लागली आहे.
गेवराई तालुक्यात शासनाने अधिकृतपणे केवळ चार वाळू लिलाव वाटप केले आहेत या चार वाळू लिलावाव्यतिरिक्त माळस पिंपळगाव असेल बोरगाव असेल सावळेश्वर असेल या ठिकाणाहून पंडितांच्या आशीर्वादाने युवराज यांचा कार्यकर्ता असलेला ढाकणे नावाचा व्यक्ती हजारो ब्रास वाळू उचलत आहे यामध्ये स्वतः युवराज यांचाच सिंहाचा वाटा असल्याची चर्चा आहे.
राजकीय पुढार्यांनी वाळूचा धंदा करणे काही नवीन नाही मात्र गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे यांनी स्वतःच वाळूचा बाजार मांडल्यासारखे केले आहे. तालुक्यातील अधिकृत वाळू लिलावावरून दहा टक्के वाळू ही घरकुल लाभार्थ्यांना वाटप करणे बंधनकारक असताना तहसीलदार मात्र राक्षस भुवन येथील गणपती पॉईंट या नव्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात जेसीबी आणि पोकलेन च्या माध्यमातून स्वतःच्या निगराणीत वाळू उपसा करत आहेत.
घरकुल च्या नावाखाली वाळू वाहतूक करताना पोलीस प्रशासनाला देखील सोबत घ्यावे लागते, त्यामुळे तहसीलदार खोमणे हे चकलंबा पोलीस ठाण्याचे प्रमुख इंगळे यांना देखील आपल्यात सामील करून घेतात. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात ही वाळू चोरली जाते.
तहसीलदार संदीप खोमणे मंडळ अधिकारी चांदणे आणि तलाठी ढाकणे आणि त्यांची टीम दुपारी बारा एक वाजण्याच्या दरम्यान गणपती पॉईंटवर दाखल होते त्या ठिकाणी जेसीबी पोकलेन आणि शेकडो हायवा उभ्या असतात. यातील काही हायवा चालकांना घरकुल लाभार्थ्यांच्या ईटीपी पावत्या दिल्या जातात या पावत्यावर गाडी क्रमांक टाकून ही गाडी लाभार्थ्याच्या दारापर्यंत पोहोचवण्याऐवजी ती दुसरीकडेच विक्री केली जाते.
घरकुल लाभार्थ्यांना वाळू देताना त्यांच्याकडून ऑनलाइन अर्ज भरून घेणे आवश्यक आहे त्याचबरोबर वाळू उपसा केला जात असताना संबंधित घरकुल लाभार्थी हा त्या ठिकाणी हजर असणे आणि त्याचा मोबाईल वर फोटो घेऊन तो महा खनिज या वेबसाईटवर अपलोड करणे आवश्यक आहे मात्र संदीप खोमणे आणि मंडळ अधिकारी चांदणे आणि ढाकणे हे सगळे नियम धाब्यावर बसून लाभार्थ्यांना 3000 तहसीलदार अँड कंपनीला सहा हजार आणि भराईसाठी 3000 याप्रमाणे 12 हजारात हायवा भरून देतात हे सगळे हायवा बीड धाराशिव शिरूर पाथर्डी संभाजीनगर जालना या ठिकाणी खाली केले जातात अशी चर्चा सुरु आहे.
विशेष बाब म्हणजे एप्रिल आणि मे या दोन महिन्यात किमान आठ ते दहा वेळा तहसीलदार खोमणे आणि मंडळ अधिकारी चांदणे आणि तलाठी ढाकणे यांच्या टीमने घरकुलाच्या नावाखाली हजारो ब्रास वाळू उपसा करत एकावेळी किमान दहा ते वीस लाख रुपये स्वतःच्या खिशात घातल्याची चर्चा आहे. बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गेवराई तालुक्यातून वाळूचा अवैध उपसा सुरू असल्याचे माहित असून देखील गेवराईच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन हे याकडे सोयीस्करपणे का दुर्लक्ष करत आहेत असा सवाल उपस्थित होत आहे.तहसीलदार खोमणे हे कलेक्टर पर्यंत यंत्रणा मॅनेज करतात की काय अशी देखील चर्चा आता सुरू झाली आहे.





Leave a Reply