News & View

ताज्या घडामोडी

3e11b90e 1e9c 4f34 978e 37130c0f894d

नीट पेपर लीक प्रकरण :नाशिक, पुणे, अहिल्यानगर मधून तिघांना अटक!

पुणेनीट पेपर फुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर मधून तिघांना अटक केली आहे. यात ब्युटी पार्लर चालवणाऱ्या पुण्यातील एका महिलेचा समावेश आहे. तसेच पोलिसांनी लातूर येथील एका क्लास चालकाची देखील चौकशी सुरु केली आहे. या क्लास चालकाने मॉक टेस्ट मध्ये घेतलेल्या प्रश्नापैकी 42 प्रश्न नीट परीक्षेत आल्याने या क्लास चालकाची चौकशी करण्यात येतं आहे.

नीट पेपरफुटी प्रकारणाचे महाराष्ट्र कनेक्शन उघडकीस आल्यानंतर नाशिक पोलिसांनी शुभम खैरनार याला ताब्यात घेतले, त्यानंतर अहिल्यानगर येथून लोखंडे याला आणि पुणे येथून ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेला अटक केली आहे.

पुणे पोलिसांनी याप्रकरणी धडक कारवाई करत मनीषा वाघमारे या ४६ वर्षीय महिलेला ताब्यात घेतले आहे. अहिल्यानगर (अहमदनगर) येथील मुख्य संशयित आरोपीला या महिलेनेच या बेकायदेशीर कामात मोठी रसद पुरवल्याचा पोलिसांचा भक्कम संशय आहे.
प्राथमिक तपासात अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे की, मनीषा वाघमारे हिचे पुण्यात ब्युटी पार्लर होते, मात्र हे केवळ एक दिखाव्यापुरते साधन होते. प्रत्यक्षात या पार्लरच्या पडद्याआडून वैद्यकीय प्रवेशाचे आणि पेपरफुटीचे एक मोठे व सुनियोजित रॅकेट चालवले जात असल्याचा पोलिसांचा कयास आहे. पैशांच्या आमिषाने गरजू विद्यार्थ्यांना जाळ्यात ओढणे आणि त्यांना मुख्य आरोपींपर्यंत पोहोचवणारी ‘मध्यस्थ’ म्हणून ही महिला काम करत असल्याचा गंभीर आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे.
पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात मनीषा हिचा मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर महत्त्वाची इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. या उपकरणांच्या तांत्रिक तपासणीतून अनेक खळबळजनक बाबी उघडकीस आल्या आहेत. अहिल्यानगर येथून नुकतेच अटक करण्यात आलेला संशयित धनंजय लोखंडे आणि मनीषा यांच्यात सातत्याने संपर्क असल्याचे निष्पन्न झाले आहे. दोघांमधील व्हॉट्सॲप चॅट्स  आणि कॉल रेकॉर्ड्स पोलिसांच्या हाती लागले असून, हा घोटाळा उघडकीस आल्यानंतरही ते दोघे सतत एकमेकांच्या संपर्कात राहून माहितीची देवाणघेवाण करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
बिबवेवाडीतून ताब्यात घेतल्यानंतर पुणे पोलिसांनी या संशयित महिलेची सलग अडीच ते तीन तास सखोल चौकशी केली. या चौकशीदरम्यान, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये बेकायदेशीर प्रवेश मिळवून देण्यापासून ते विद्यार्थ्यांपर्यंत फुटलेले पेपर पोहोचवण्याच्या संपूर्ण साखळीत तिचा सक्रिय सहभाग असल्याचे स्पष्ट संकेत पोलिसांना मिळाले आहेत. या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य पाहता, अधिक सखोल व देशव्यापी तपासासाठी या महिलेला आज संध्याकाळपर्यंत केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) ताब्यात दिले जाण्याची दाट शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे.

१२ मे रोजी एका विद्यार्थिनीच्या पालकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात लेखी तक्रार दिली की, लातूरमधील एका शिकवणी वर्गाने परीक्षेपूर्वी दिलेल्या सराव चाचणीमधील तब्बल ४२ प्रश्न नीट परीक्षेत जशास तसे आले होते. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्याकडे चौकशी सोपवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *