News & View

ताज्या घडामोडी

1c98c8654aa5465a9c49b20f4a5431c0 scaled

नियती सगळ्यांचा हिशोब करते -धनंजय मुंडे!

पाथर्डी  – गेल्या वर्ष दीड वर्षांपासून मीडिया ट्रायल मुळे अडचणीचा सामना करणारे माजीमंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी नारायणगड आणि भगवानगड येथील नारळी साप्ताहाला भेट देत आशीर्वाद घेतले. नियती सगळ्यांचा हिशोब करत असते त्यामुळे कोणाचा द्वेष करू नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कोणी आपल्याला दोष देवो किंवा आपलं द्वेष करो, आपण मात्र कोणाला दोष द्यायचा नाही किंवा कुणाचा द्वेष करायचा नाही नियती सर्वांचा हिशोब नीट करत असते असे वक्तव्य माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी केले आहे. श्रीक्षेत्र भगवानगडाच्यावतीने पाथर्डी तालुक्यातील बडेवाडी येथे आयोजित अखंड नारळी सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात धनंजय मुंडे बोलत होते.

भक्ती, शक्ती आणि विश्वासाची भगवानगडाची परंपरा आहे. लाखो ऊसतोड कामगार आपल्या एक रुपया कमाईतील वीस पैसे देणगी भगवानगडाला देतात आणि त्यातूनच या गडाची महती आज देश विदेशात पोहोचली आहे. ऐश्वर्या संपन्न संत भगवान बाबांनी भगवान गडाची गादी ही ऐश्वर्या संपन्न बनवली ऐश्वर्या संपन्नतेची ती परंपरा आभारीत राखण्याचे काम आज गडाचे महंत न्यायाचार्य ह. भ. प. डॉ. नामदेव शास्त्री यांच्यामार्फत केले जात असल्याचे विधानही यावेळी धनंजय मुंडे यांनी केले.

माजीमंत्री धनंजय मुंडे हे भगवान गडाच्या नारळी साप्ताहाला दरवर्षी हजर असतात, मात्र यावेळी त्यांनी नारायणगडाच्या साप्ताहाला देखील हजेरी लावली, या साप्ताहाला मनोज जरांगे पाटील देखील हजर राहणार होते, मात्र अचानक त्यांनी प्रकृतीचे कारण देत येथे येणे टाळले. गेल्या वर्ष दीड वर्षांपासून या दोघांतील संघर्ष सर्वश्रुत आहे, कदाचित मुंडे येणार म्हणूनच पाटील यांनी येणे टाळले कि काय अशी चर्चा सुरु होती.

भगवानगड हे आपले ऊर्जा स्थान असून भगवानगडाच्या सावलीत आपल्याला नेहमी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते, असेही धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले. यावेळी व्यासपीठावर महंत डॉ. नामदेव शास्त्री, गडाचे उत्तराधिकारी ह. भ. प. कृष्णा महाराज शास्त्री, आईसाहेब संस्थानच्या ह. भ. प. राधाताई सानप, खा. निलेश लंके, आ. मोनिकाताई राजळे, माजी आ. बाळासाहेब आजबे, ॲड. प्रताप ढाकणे, ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके यांसह आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या आधी बडेवाडी व परिसरातील ग्रामस्थांनी धनंजय मुंडे यांची जंगी मिरवणूक काढत फुलांची उधळण करत जोरदार स्वागत केले.

उमापूर येथे नारायणगडाच्या सप्ताहासही दिली भेट, महंत शिवाजी महाराजांचे घेतले आशीर्वाद

दरम्यान बडेवाडी येथे जाण्याअगोदर धनंजय मुंडे यांनी गेवराई तालुक्यातील उमापूर येथे श्री क्षेत्र नारायणगडाच्या नारळी सप्ताहाच्या सांगता समारंभात उपस्थिती लावली. यावेळी गडाचे महंत ह. भ. प. शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेतले. याप्रसंगी ग्रामस्थानी धनंजय मुंडे यांचे स्वागत केले, यावेळी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित हेही उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *