बीड –बीड जिल्ह्यात झालेल्या कथित शिक्षक भरती घोटाळ्यात दोन्ही शिक्षणाधिकारी यांचे निलम्बन झाले असलेल्या तरी कर्मचारी मात्र मोकाट आहेत. परंतु शासन स्तरावर या घोटाळ्याची चौकशी सुरु असून लवकरच प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील दोषी कर्मचाऱ्यांवर देखील गंडातर येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नागपूर प्रमाणेच बीड जिल्ह्यात देखील शालार्थ आय डी घोटाळा झाल्याच्या तक्रारी शासनाकडे झाल्या. त्यानंतर या सगळ्या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरु झाली, ज्यामध्ये प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी आणि माध्यमिक चे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
मात्र या कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कुठलीच कारवाई झाली नाही. याबाबत शासनाकडे तक्रार झाल्यानंतर आता शासनाकडून प्राथमिक आणि माध्यमिक विभागात बोगस शिक्षक भरती प्रक्रियेत सहभाग असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती गोळा केली जातं आहे.
विशेष बाब म्हणजे या दोन्ही विभागासह पे युनिट मधील अधिकारी आणि कर्मचारी देखील यात दोषी असल्याचे समोर आले आहे. नोकर भरती बंद असताना देखील प्राथमिक आणि माध्यमिक विभागाने बोगस शालार्थ आय डी काढून भरती केली. यासाठी लाखो रुपयांचा व्यवहार झाला. ज्यामध्ये या कर्मचाऱ्यांचे वेतन काढण्यासाठी पे युनिट मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देखील हातभार लावल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता या सगळ्या दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगरला जाणार आहे.
आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्यावर आपली यातून सुटका व्हावी म्हणून या विभागातील कर्मचाऱ्यांनी शासकीय पातळीवर मॅनेजमेंट करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र या सगळ्या घोटाळ्याची एस आय टी कडून चौकशी सुरु असल्याने या सगळ्यांवर कारवाई होणार हे निश्चित आहे. त्यामुळे या विभागातील कर्मचारी हवालदिल झाले आहेत.












Leave a Reply