मुंबई –अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी खा सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा लोकभवन येथे शनिवारी सायंकाळी पाच वाजता पार पडला. तत्पूर्वी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस च्या गटनेते पदावर निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाने सुनेत्रा अजित पवार यांची विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड केली. त्यांच्या नावाचा प्रस्ताव आमदार दिलीप वळसे पाटील यांनी मांडला तर मंत्री छगन भुजबळ यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार, खासदार उपस्थित होते. या सगळ्यांनी एकमताने सुनेत्रा पवार यांच्या विधिमंडळ गटनेते पदावर शिक्कामोर्तब केले.
सुनेत्रा पवार यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवली होती, पण त्यांना यश मिळालं नाही. तरीही त्यांचा राजकीय प्रवास थांबला नाही. 18 जून 2024 रोजी त्या राज्यसभेच्या सदस्य झाल्या आणि संसदेच्या वरिष्ठ सभागृहात सक्रिय भूमिका बजावू लागल्या.
सुनेत्रा पवार यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1963 रोजी महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील तेर गावात झाला. त्यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक आणि गावातील प्रतिष्ठित व्यक्तींपैकी एक होते. त्यांचे कुटुंब शेतीशी जोडलेले होते. सुनेत्रा पवार यांनी एप्रिल 1983 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर एस. बी. आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज,छत्रपती संभाजीनगर येथून पदव्युत्तर पदवी घेतली. त्यांनी सामाजिक आणि पर्यावरण संबंधित कोर्सही केले आहेत. पुस्तके वाचणे, निसर्गाची फोटोग्राफी करणे आणि चित्रकला हे त्यांचे आवडते छंद आहेत.
राजकारणापूर्वी सुनेत्रा पवार सामाजिक आणि संस्थात्मक कामांमध्ये सक्रिय होत्या. त्या बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्क आणि एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया (NGO) च्या अध्यक्षा आहेत. याशिवाय, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यही राहिल्या आहेत. कृषी आणि शिक्षणाशी संबंधित अनेक संस्थांमध्ये विश्वस्त म्हणून त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.












Leave a Reply