बीड – बीडच्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यातून राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी माजलगाव चे आमदार प्रकाश सोळंके आणि विजयसिंह पंडित यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली होती त्याला आमदार सोळंके यांनी खरमरीत उत्तर देत मुंडेंनी स्वतःपुरतं बघावं निष्ठेच्या गप्पा मारू नयेत आम्ही त्यांच्यापेक्षा सीनियर आहोत चिल्लर नाहीत असं म्हणत हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटातच हा वितंड वाद सुरू झाल्याने दादा जिल्ह्यातील नेत्यांना समज देणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.
बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात आ.धनंजय मुंडे यांनी आ.प्रकाश सोळंके यांना निवडून आणण्यासाठी मदत केल्याचे म्हटले होते. त्यावर उत्तर देताना त्यांच्याच गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडेंवर सडकून टिका केली. माध्यमांशी बोलताना प्रकाश सोळंके म्हणाले, धनंजय मुंडेंनी कोणाला मदत केली सांगायची गरज नाही. धनंजय मुंडेंना राजकारणात कोणी आणलंय हे त्यांनी सांगावं, फार मोठे झाल्यासारखं त्यांना वाटत असेल त्यांनी जमिनीवर पाय ठेवून बोलावं आणि पक्षनिष्ठाच्या गप्पा तर त्यांनी मारूच नये. त्यांची पक्षनिष्ठा किती आहे हे मला माहित आहे. कारण माझ्या विरोधातच एकाच पक्षाचे असताना दोन ओबीसीचे उमेदवार उभे केले होते. गेवराई मतदार संघातही विजयसिंह पंडितांच्या विरोधात आणि आष्टी मतदारसंघात सुरेश धस यांच्याविरोधात ओबीसी उमेदवार उभे करण्यात आले होते. त्यांचीही पक्षनिष्ठा जगजाहिर आहे. त्यांनी पक्षनिष्ठेच्या गप्पा मारू नयेत, जीवनात कोणाशी निष्ठा ठेवली हेच त्यांनी सांगावे. आमच्यावर बोलताना त्यांनी सांभाळून बोलावे कारण मी पाच वेळा आमदार झालोय, विजयसिंह पंडित सुद्धा त्यांच्या वडिलांच्या काळापासून राजकारणात आहेत. धनंजय मुंडेंचा जन्मही झाला नसेल तेव्हापासून पंडित कुटुंब राजकारणात आहे. धनंजय मुंडेंचा अभ्यास कमी आहे असे म्हणत त्यांनी लक्ष्मण हाकेंचा समाचार घेतला. लक्ष्मण हाकेंनी बीडमध्ये येवून मोठ्या वल्गना करत जावू नयेत, हाकेंना त्यांच्या मतदारसंघात २५३ मते मिळाली आहेत ते काय आम्हाला मदत करणार. असा सवाल उपस्थित केला.
भुजबळांनी मंत्रीपद
सोडून बोलायला पाहिजे
बीडच्या ओबीसीच्या मेळाव्यात छगन भुजबळ जे बोलले, ते कितपत योग्य आहे. कारण तेच मंत्री आहेत. मंत्रिमंडळामध्ये असताना हैदराबाद गॅझेटचा जीआर कॅबिनेटचा निर्णय होता. तरी तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलता, त्यांनी त्यांचे मत व्यक्त करावे, त्यांनी बोलावे पण मंत्रीपद सोडून असा प्रतिहल्ला आ.प्रकाश सोळंके यांनी केला.












Leave a Reply