News & View

ताज्या घडामोडी

IMG 20250902 WA0014

बसखाली चिरडून महिलेचा मृत्यू!

अंबाजोगाई -येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात नोकरीस असलेल्या विजयमाला सरवदे यांचा बसखाली आल्याने चिरडून मृत्यू झाला. अपघातास जबाबदार असणाऱ्या बस चालकावर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

केज येथील मूळ रहिवासी असलेल्या आणि गेल्या ३५ वर्षांपासून अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या विजयमाला नानाभाऊ सरवदे (वय ५५) यांचा आज सकाळी धारूर आगाराची धारूर – परळी एसटी बस क्रमांक एमएच १५ एमएच २३४७ या क्रमांकाच्या खाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. बस चालकाच्या बेजबाबदारपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

विजयमाला सरवदे या रोजच्याप्रमाणे आज सकाळी सहा वाजता आपल्या घरातून कामावर जाण्यासाठी निघाल्या होत्या. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्या अंबाजोगाई येथील मोरेवाडी पाण्याच्या टाकीजवळ बसमधून उतरत होत्या. त्याचवेळी, बस चालकाच्या लक्षात आले नाही की सरवदे या खाली उतरल्या आहेत. त्याने बस पुढे घेतली आणि त्या बसच्या चाकाखाली आल्या. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सरवदे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.


या अपघातासाठी जबाबदार असलेल्या बस चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी मयत महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *