तुतीची सात लाख झाडे लावून दादा कसलं वृक्षारोपण करणारं!
दादा धन्यवाद, तुमच्यामुळे आम्हाला कळलं कि तुती सुद्धा वृक्ष आहे!
बीड – शासनाच्या योजना कागदावर कशा राबवायच्या याचा मूर्तीमंत उदाहरण बीडमध्ये पाहायला मिळत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी बीड जिल्ह्यात तीस लाख वृक्ष लागवड केली जाणार आहे मात्र यामध्ये सात लाख वृक्ष ही तुतीची आहेत हा निव्वळ शासनाच्या योजना कागदावरच राबवण्याचा उद्योग आहे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना यातून नेमकं काय साधायचे अशी चर्चा होऊ लागले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री असणाऱ्या अजित पवार यांच्याकडे बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे. अजित पवार यांनी सूत्र हाती घेतल्यापासून अधिकारी शिस्तीच्या नावाखाली सर्वसामान्यांची कामे टाळण्याचा प्रयत्न करत आहेत.
अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी सात ऑगस्ट रोजी हरित महाराष्ट्र अभियान अंतर्गत बीड जिल्ह्यात एकाच दिवशी तीस लाख वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे मात्र हा कार्यक्रम म्हणजे केवळ पाट्या टाकण्याचा उद्योग असल्याचे समोर येत आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या दरम्यान वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवला जातो मात्र नंतर त्या वृक्षाचे जोपासना होत नाही 70% पेक्षा अधिक वृक्ष जळून जातात किंवा जनावरे खातात आणि या योजनेच्या माध्यमातून सामाजिक वनीकरण वन विभाग महसूल येथील अधिकाऱ्यांची पोट भरतात.
यावर्षी देखील अजित पवारांच्या उपस्थितीत जो तीस लाख वृक्ष लागवडीचा कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये सात लाख तुतीची झाड लावण्यात येणार आहेत. हा म्हणजे निव्वळ शुद्ध वेडेपणाच म्हणावा लागेल. 2021 पासून शासनाने तुतीच्या लागवडीस वृक्ष लागवड अशी मान्यता दिल्याने याचा फायदा घेत यावर्षी पवारांच्या उपस्थितीत सात लाख तुतीचे वृक्ष लागवडीचे टारगेट रेशीम संचालनालयाला देण्यात आले आहे.
मुळात प्रश्न हा आहे की तीन वर्षानंतर जर का तुतीचे झाड मोडून टाकले जात असेल तर वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात अशी झाडे लावून हरित महाराष्ट्राचे टार्गेट कसे पूर्ण होणार आणि महाराष्ट्र खरोखरच सुजलाम सुफलाम कसा होणार.
तुतीसारखी झाडे जर का सात लाखाच्या संख्येने लावली जाणार असतील तर वृक्ष लागवडीचा हा कार्यक्रम कशा पद्धतीने कागदावरच राबवला जाणार हे उघडपणे दिसू लागले आहे अशा पद्धतीने पाट्या टाकून अथवा थुक्याला थुका लावून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे.












Leave a Reply