News & View

ताज्या घडामोडी

महाविकास आघाडीचा बीडमध्ये मुकमोर्चा !

बीड- शिवसेना नेते खा.संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी बीडमध्ये महाविकस आघाडी आज एकवटली. संतप्त महाविकास आघाडीच्या पदाधिकर्‍यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चाचे आयोजन करून मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले. यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी आपला संताप व्यक्त करत धमक्या प्रकरणी सरकारचा निषेध केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत यांना गेल्या काही दिवसांपासून धमक्या येत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. खा.संजय राऊत यांनाही भ्रमणध्वनीवरून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. एकीकडे राज्यात विरोधी पक्षांच्या नेत्यांवर दबावतंत्राचा वापर करून धमक्या दिल्या जात असताना सरकार मात्र गप्प बसून आहे. सरकारच्या या कुचकामी धोरणाच्या निषेधार्थ बीडमध्ये महाविकास आघाडी आज एकवटली.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी आयोजित केलेल्या मूक मोर्चात महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी प्रचंड सहभाग नोंदवला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून निघालेला हा मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. पदाधिकार्‍यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना दिले.

या मोर्चामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्यासह आ.संदीप क्षीरसागर, आ.विक्रम काळे, आ.बाळासाहेब आजबे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, शिवसेनेचे माजी आमदार सुनील धांडे, माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार सय्यद सलीम, माजी आमदार उषाताई दराडे, सुशिलाताई मोराळे, माजी आमदार संजय दौंड, माजी आमदार राजेंद्र जगताप, विजयसिंह पंडित, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर, शहरप्रमुख सुनील सुरवसे, तालुकाप्रमुख गोरख सिंगण यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *