बीड- दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय तंत्रनिकेतन अर्थात आयटीआय मध्ये प्रवेश घेण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.राज्यभरात यावर्षी आयटीआय मध्ये वेगवेगळ्या ट्रेड च्या दीड लाख जागांवर हे प्रवेश दिले जाणार आहेत.विद्यार्थ्यांनी आपल्या नजीकच्या आयटीआय मध्ये संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यावर्षी एकूण 418 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व 574 अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधुन अनुक्रमे 95,380 व 59,012 अशा एकूण 1,54,392 जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत.
यावर्षी प्रवेशासाठी उपलब्ध व्यवसायांची संख्या 83 असून त्यामध्ये पारंपरिक इलेक्ट्रिशियन, फिटर, मेकॅनिक मोटर व्हेईकल, डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग टेक्निशियन, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, वेल्डर यासारख्या लोकप्रिय व्यवसायांबरोबरच नव्याने सुरू होणाऱ्या एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर तसेच ड्रोन टेक्निशियन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या व्यवसायांचा समावेश करण्यात आलेला आहे.
उपलब्ध जागांपैकी 53600 जागा मुलींसाठी राखीव असून इतर प्रवर्गनिहाय आरक्षणानुसार अनुसूचित जातींसाठी 20072, अनुसूचित जमातीसाठी 10808, इतर मागासवर्ग 29335, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 15439, विमुक्त जाती 4631, भटक्या जमाती (ब) (क) व (ड) यासाठी अनुक्रमे 3859, 5404 व 3088 एवढ्या जागा उपलब्ध आहेत. याचबरोबर अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी 2548, दिव्यांग उमेदवारांसाठी 7719 व खुल्या गटातील उमेदवारांसाठी 61756 जागा उपलब्ध आहेत.
2023 या वर्षापासून नव्याने 257 तुकड्यांना डीजीटी, नवी दिल्ली यांचेकडून संलग्नता प्राप्त झालेली असून या व्यवसायांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहेत. यामुळे महाराष्ट्र राज्याच्या प्रवेश क्षमतेमध्ये 5140 एवढ्या भरघोस जागांची वाढ झालेली आहे. या वर्षभरात ड्युअल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग अंतर्गत नव्याने 30 तुकड्यांना मान्यता प्राप्त झालेली असून या माध्यमातून प्रशिक्षणार्थ्यांना थेट औद्योगिक आस्थापनांमध्ये जाऊन सुमारे सहा महिने एवढ्या कालावधीपर्यंतच्या प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे. यामुळे या प्रशिक्षणार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल.
Leave a Reply