News & View

ताज्या घडामोडी

वीज जोडणी रखडल्याने शेतकरी हैराण !

बीड- यावर्षी पाऊस चांगला होण्याची शक्यता आहे. मान्सून दारात असताना शेतकरी मात्र वेगळ्याच चिंतेत आहे.मराठवाडा आणि विदर्भात लाखाच्या आसपास शेतकऱ्यांनी वीज जोडणी साठी अर्ज देऊन अनेक महिने उलटले तरीही महावितरण कडून जोडणीची कारवाई न झाल्याने पिकांना पाणी द्यायचे कसे या चिंतेने शेतकरी हैराण झाले आहेत.

राज्यात वीज खातेदार शेतकऱ्यांची संख्या एक कोटी, ५२ लाख, ८५ हजार, ४३९ इतकी आहे. त्यापैकी ४४ लाख ३९ हजार ९७५ शेतकऱ्यांना ३१ मार्च २०२१ अखेर कृषीपंप जोडण्या देण्यात आल्या. दरवर्षी सरासरी दोन लाखांच्या आसपास शेतकरी वीज जोडणीसाठी अर्ज करतात. त्यातील लाख ते सव्वा लाख शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळते. परिणामी, दरवर्षी प्रतीक्षा यादी वाढत आहे. सध्या सर्वात मोठी प्रतीक्षा यादी मराठवाडय़ातील शेतकऱ्यांची आहे. तिथे ४४ हजार ३११ शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत.

मराठवाडय़ानंतर प्रतीक्षा यादीत विदर्भातील शेतकऱ्यांचा क्रमांक लागतो. तिथे आजघडीस ३८ हजार २८४ शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात १८ हजार ४७६ ,उत्तर महाराष्ट्रात चार हजार ८४२ आणि कोकण भागात ४२७ मागणी केलेले शेतकरी जोडणीवाचून वंचित आहेत. राज्यातील शेतकऱ्यांची वीजजोड प्रतीक्षा यादी एक लाख ६ हजार ३४० इतकी आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून राज्यात १४ जिल्ह्यांची सरकार दरबारी नोंद आहे. या जिल्ह्यांत आत्महत्या रोखण्यासाठी सरकारचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. बहुतांश १४ जिल्हे हे मराठवाडा आणि विदर्भातील आहेत. याच भागांत वीज जोडणीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे.

शुल्क भरून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची ही शासकीय आकडेवारी असली तरी कृषीपंपासाठी अर्ज केलेल्या, मात्र शुल्क न भरलेल्या शेतकऱ्यांचा त्यात समावेश नाही. त्यामुळे एकूण आकडा अडीच ते तीन लाखांच्या घरात आहे. वर्षांनुवर्षे हा प्रकार सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *