बीड – जगातील सर्वात उंच एव्हरेस्ट शिखर सर करताना चार वर्षांपूर्वी ज्या दिवशी पत्नीचे निधन या मोहीम दरम्यान झाले त्याच दिवशी म्हणजे 22 मे 2023 रोजी हे शिखर दुसऱ्यांदा सर करत बीडच्या शरद कुलकर्णी यांनी आपल्या पत्नीला अनोखी श्रद्धांजली अर्पण केली.
मुळ बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेले आणि सध्या ठाण्यात स्थिरावलेले शरद दिनकर कुलकर्णी यांनी 23 मे रोजी जगातील सर्वात उंच असणारे माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले . विशेष म्हणजे चार वर्षात दोन वेळा त्यांनी हे शिखर सर केले तर वयाची साठ वर्ष पूर्ण करून हे शिखर सर करणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत .
एव्हरेस्ट शिखर सर केल्यानंतर शरद कुलकर्णी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की,चार वर्षात दोन वेळा एव्हरेस्ट शिखर सर करणारा देशातील मी एकमेव आहे.या कामगिरीमुळे आपल्याला अत्यानंद झाला आहे.23 मे 2023… सकाळचे दहा वाजून 40 मिनिट झालेत…मी आणि माझा शेर्पा ‘टेंबा दाईने ‘ अखेर जगातील एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवले… आणि मी माझं मलाच चार वर्षापूर्वी दिलेलं वचन पूर्ण झालं. एक स्वप्न पूर्ण झालं… खरं तर एव्हरेस्ट शिखर या वयात आणि तेही दुसऱ्यांदा सर करणं हा चक्क वेडेपणाच होता… पण 2019 ला एव्हरेस्ट शिखरावर वर पाऊल ठेवूनही काही कारणामुळे माझ्या भारताचा झेंडा मला फडकवता आला नव्हता… फोटो काढता आले नव्हते… अंजलीला तेथेच असाह्यपणे सोडून खाली यावे लागण्याची बोच कायमची मनात सलत होती… एव्हरेस्ट जिंकूनही एक हरलेलं स्वप्न ठरलं होतं… तेथेच मी मला वचन दिलं होतं… मी परत एकदा ‘एव्हरेस्ट ‘ सर करेन…आणि त्याच बरोबर सेवन समिट मधील उरलेली तीन शिखरे अकांकागुआ, माऊंट विन्सन, आणि माऊंट देनाली पण सर करेन आणि मी व अंजलीने पाहिलेले स्वप्न पूर्ण करेन…
हया चार वर्षात ह्याच स्वप्नाचा पाठपुरावा करीतच मी जगलो… आणि ते अखेर पूर्ण झालं… एक अतीव समाधान मिळालं.. मन शांत शांत झालं…
माझे एक एव्हरेस्ट एवढेच उंच पाहिलेले स्वप्न अखेर एव्हरेस्टनेच पूर्ण केले…
खरं तर काल 22 मे तारीख होती. काल अंजलीला जावून बरोबर चार वर्ष झाली… 22 तारखेस कॅम्प चार वरून सहा वाजता निघतानाच रात्री प्रचंड बर्फ वर्षाव सुरू झाला. आणि रात्री नऊ पर्यंत सुरू राहिला..म्हटलं संपलं सगळं… आज जर समिटपुश नाही केले तर परत खाली यावे लागणार. कारण deth zone मध्ये ऑक्सीजन सिलेंडर लिमिटेड असतात. एक दिवसही अतिरिक्त राहता येत नाही. पण परत एकदा निसर्गानं ऐकलं… नऊ वाजता बर्फ वर्षाव आणि वारे पण थांबले. आणि सरदार शेर्पाने रात्री दहा चाळीसला निघायचा निर्णय घेतला… आम्ही gares अंगावर चढवले. आणि समिट पुश साठी निघालो…. बाल्कनी पर्यंत आणि पुढे साऊथ समेट पर्यन्तच्या अंजलीच्या आठवणी जाग्या झाल्या… त्या सोबत करत होत्या आणि मला एक्स्ट्रा एनर्जी देत होत्या. अखेर सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांनी म्हणजे बरोबर बारा तासांनी आम्ही एव्हरेस्ट शिखरावर वर पाऊल ठेवले. आणि मी माझ्या आश्रुना वाट मोकळी करून दिली… माझा नातू इषांकची आठवण म्हणून त्याने वापरलेले छोटेसे मोजे, अंजलीला आवडती कॅडबरी, आणि आमची दोघांची आठवण म्हणून आमचे लॉकेट तेथे अर्पण केले. प्रचंड समाधान वाटले…मी एकदम हलका झालो… रीता झालो… मीच माझ्या मनाला केलेली कमिटमेंट पूर्ण झाल्याचे प्रचंड समाधान झाले… शिखरावर आणि काही फोटो काढून समाधानाने उतरायला सुरुवात केली…
वयाच्या साठाव्या वर्षानंतर ‘एव्हरेस्ट शिखर’ करणारा मी पाहिला जेष्ठ भारतीय ठरलो….
Leave a Reply