बीड- महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत आता कांदाचाळ चा देखील समावेश करण्यात आला आहे. कांदाचाळ उभारणीच्या कामासाठी लागणारा किमान एक लाख 60 हजाराचा खर्च मनरेगा मधून दिला जाणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन रोहयो विभागाने केले आहे.
रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड, वृक्ष लागवड व फुलपीक लागवड कार्यक्रमाची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे. या योजनेतील अकुशल मजुरीच्या दरात सुधारणा केली असून १ एप्रिलपासून राज्यात मजुरीचा दर २७३ रुपये प्रति मनुष्यदिन याप्रमाणे निश्चित केला आहे.
तर कृषी विभागाच्या १२ एप्रिल रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या झालेल्या बैठकीमध्ये कांदाचाळ उभारणी ‘मनरेगा’अंतर्गत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार कांदाचाळीचा समावेश करण्यात आला आहे.
कांदा हे नाशवंत पीक असल्याने काढणीपश्चात साठवणूक शास्त्रीय पद्धतीने न झाल्यास ४५ ते ६० टक्क्यांपर्यंत नुकसान होते. यामध्ये प्रामुख्याने नुकसान वजनातील घट, कांद्याची सड व कोंब येणे आदी कारणांमुळे होते. त्यामुळे साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी कांदाचाळ उभारणीबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे.
सद्यःस्थितीत मनरेगाचे अकुशल मजुरीचे दर २७३ रुपयांनुसार कांदाचाळ प्रकल्प उभारणीकरिता एकूण लागणारे मनुष्यदिन ३५२.४५ त्यानुसार ९६ हजार २२० रुपये इतकी मजुरी तसेच साहित्यासाठी लागणारा खर्च मजुरीवर होणाऱ्या खर्चाच्या ४० टक्क्यांच्या मर्यादेत ६४ हजार १४७ रुपये इतका खर्च आहे.असा ‘मनरेगा’अंतर्गत मजुरी व साहित्याचा एकूण खर्च १ लाख ६० हजार ३६७ रुपये दिला जाणार आहे. तर पुढील आर्थिक वर्षात मजुरीचा दर वाढल्यास याच्यातसुद्धा वाढ होणार आहे. तर उर्वरित २ लाख ९८ हजार ३६३ रुपयांचा निधी लोकवाट्याच्या माध्यमातून प्रस्तावित आहे.
Leave a Reply