अंबाजोगाई – माजी आ.संजय भाऊ दौंड यांनी महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या पाठीशी सर्व ताकदीने उभे राहण्याचा निर्णय घेतला असुन, ते आजपासूनच धनंजय मुंडे यांच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याचे आज धनंजय मुंडे व माजी आ.संजय भाऊ दौंड यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
माजी आ.संजय भाऊ दौंड हे विधानसभा निवडणुकीत इच्छुक असून, ते धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवतील का, या चर्चेला आता पूर्णविराम लागला आहे.
2014 व 2019 या दोनही विधानसभा निवडणुकीत आम्ही दोघे सोबत होतो. एकदिलाने आम्ही एकत्र काम केले. 2019 च्या निवडणुकीत मी विजयी झालो, त्यात संजय भाऊंचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांनंतर संजय भाऊंना पण विधानपरिषद सदस्यत्वाची संधी मिळाली. आता पुन्हा मी विधानसभा निवडणुकीत सामोरा जात आहे, तेव्हा संजय भाऊ हे पूर्ण ताकदीने माझ्या सोबत आहेत, याचा मला मनापासून आनंद आहे, असे धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.
आगामी काळात पक्ष संजय भाऊंना आणखी उत्तम संधी मिळवुन देईल, असा विश्वासही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.
धनंजय मुंडे हे माझे बंधू आहेत. मागच्या आठवड्यात मी माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा केली आणि आज धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय मी जाहिर करत आहे. धनंजय मुंडे यांची ही निवडणूक ही माझी निवडणूक आहे, असे समजून मी पूर्ण क्षमतेने प्रचाराच्या मैदानात उतरणार असल्याचे माजी आ.संजय दौंड यांनी यावेळी बोलताना सांगितले.
मुंडे-दौंड कुटुंबातील स्नेह कधीच कमी होणार नाही, आम्ही कायम एकदिलाने काम करत राहू, असेही धनंजय मुंडे म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.राजेश्वर आबा चव्हाण, ज्येष्ठ नेते दत्ता आबा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी विधानसभा अध्यक्ष गोविंदराव देशमुख, शिवाजी सिरसाट, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष राजाभाऊ औताडे, विश्वाम्भर फड, रणजित लोमटे, राजवर्धन दौंड यांसह प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
Leave a Reply