बीड – तब्बल साडेतीन हजार कोटी रुपयांचा अपहार प्रकरणी देशात गाजत असलेल्या बीडच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी बाबत खळबळजनक बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे कुटे यांच्या कंपनीला भेट देण्यासाठी गेलेल्या ठेवीदारावर सुरक्षारक्षकाने गोळीबार केला. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे.
वैजापूर तालुक्यातील काही खातेधारकांनी सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा मल्टिस्टेट वैजापूर शाखेत लाखोंची गुंतवणूक केली आहे. मात्र, मल्टिस्टेट बंद पडल्याने या ठेवीदारांचे पैसे मिळण्याची शक्यता नसल्याने यापैकी पाच खातेधारक हे सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास गंगापूर तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर- अहमदनगर मार्गावर ढोरेगाव शिवारात असलेली कुटे यांची तिरूमला कंपनी सुरू आहे की नाही, हे पाहण्यासाठी पोहोचले. त्यानंतर ‘आम्हाला कंपनीत प्रवेश द्या’ अशी मागणी ते सुरक्षारक्षकाकडे करत होते. सुरक्षारक्षकाने तुम्ही आत येऊ नका असे सांगितले असता काही ठेवीदार कंपनीमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असताना तेथे कंपनीद्वारे नियुक्त शौर्य एजन्सीच्या योगेश बबन तनकुरे (डबल बोर परवाना धारक सेवानिवृत्त सैनिक (वय ४०, रा. आखेगाव, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) या सुरक्षा रक्षकाने त्याच्याजवळील छर्रा बंदुकीने गोळीबार केला. त्यात शिवनाथ देविदास आहेर (३३, रा. नगिना पिंपळगाव, ता. वैजापूर) यांच्या डोक्याला व हाताला छर्रा चाटून गेल्याने ते जखमी झाले. त्यांच्या सोबतच्या इतर सहकाऱ्यांनी आहेर यांना जखमी अवस्थेत येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी जखमी शिवनाथ आहेर यांच्या फिर्यादीवरून कंपनीचा सुरक्षा रक्षक योगेश बबन तनकुरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
सुरक्षा रक्षकानेही दिली पाच जणांविरुद्ध फिर्याद
या घटनेतील आरोपी सुरक्षा रक्षक तनकुरे यांनीही पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल अशोक देवरे (वय ३१, रा. लक्ष्मीनारायणनगर, वैजापूर), पुष्पेंद्र कृष्णदास बापते (४३, नवजीवन कॉलनी, वैजापूर), ज्ञानेश्वर श्रीराम गायके (३२, रा. भिवगाव, ता. वैजापूर),योगेश सुभाष गायकवाड (३५, रा.गायकवाडवाडी, वैजापूर) यांच्या विरोधात सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणे व खासगी मालमत्तेत जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
Leave a Reply