News & View

ताज्या घडामोडी

जिल्ह्यात अतिवृष्टी, नद्या नाल्याना पूर!

बीड -जिल्ह्यात गेल्या चोवीस तासापेक्षा अधिक काळापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्या नाले, ओढे ओसंडून वाहू लागले आहेत. बीड शहराला पाणी पुरवठा करणारे बिंदूसरा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. जिल्ह्यातील 61महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तब्बल शंभर मिलिमिटर पेक्षा जास्त पाऊस 35महसूल मंडळात झाला आहे.

बीड जिल्ह्यामध्ये एकूण 61 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे

100 मिलिमीटर च्या वर एकूण 35 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे.

सर्वात जास्त अतिवृष्टीची नोंद झालेले महसूल मंडळ
गेवराई तालुका
रेवकी महसूल मंडळ 171.5mm

माजलगाव तालुका
गंगामसला महसूल मंडळ 171.0mm

परळी तालुका
सिरसाळा महसूल मंडळ 155.3 mm

धारुर तालुका
अंजनडोह महसूल मंडळ 108.8 mm

बीड जिल्ह्यात झालेल्या या संततधार पावसामुळे मूग, उडीद, सोयाबीन या पिकांना फटका बसला आहे. बहुतांश गावात शेतात पाणीच पाणी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

नुकसानीची माहिती ऍपवर भरा

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती तातडीने क्रॉप इन्शुरन्स ऍप वर अपलोड करावी असे आवाहन कृषिमंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि बीडचे आ संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.

या दोन दिवसात संपूर्ण बीड जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडत असून जिल्ह्यातील लहान मोठे असे जवळपास सर्वच जलाशय तुडुंब भरून नदी-नाले खळखळून वाहत आहेत; जिल्ह्यावरील जलसंकट दूर झाल्याचा आनंद असला तरी खरीप हंगामातील पिके मात्र धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीच्या निकषांपेक्षा अधिक पाऊस झाला असून काही ठिकाणी अजूनही पाऊस पडतो आहे, त्यामुळे राज्य शासनाच्या आदेशास अनुसरून पावसाचा जोर कमी होताच जिल्ह्यात सर्व ठिकाणी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे महसूल व कृषी विभागाने पंचनामे करावेत व नियमाप्रमाणे मदतीच्या मागणीसाठी राज्य शासनाकडे तातडीने पाठवावेत, असे निर्देश मंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

जलाशय व नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे

पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत आपल्या पिकांचा विमा भरलेल्या सर्व शेतकरी बांधवांनी सतर्क राहून आपल्या खरीप पिकांचे झालेले नुकसान विमा कंपनीस तातडीने निर्धारित वेळेत कळवावे; जेणेकरून आपल्या पिकांना विम्याचेही संरक्षण मिळेल. जिल्ह्यात पावसाचा जोर आणखी कायम राहिल्यास काही नद्या व जलाशय धोक्याची पातळी ओलांडू शकतात, त्यामुळे जलाशय व नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे. पुराचा धोका उद्भवू शकणाऱ्या नद्यांच्या नियंत्रण रेषेच्या क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत जिल्हा प्रशासनाला योग्य त्या सूचना धनंजय मुंडे यांनी केल्या आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *