News & View

ताज्या घडामोडी

वर्षभर धंदा करू दिल्यानंतर नारायणा स्कुल सील ! शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार !!

बीड- शहरातील अंबिका चौक भागात असलेल्या नारायणा स्कुल ला शासनाची परवानगी नसताना तब्बल वर्षभर ही शाळा शिक्षण विभागाच्या आशीर्वादामुळे बिनबोभाट सुरू होती.अनेकदा तक्रारी झाल्या मात्र तोडीपाणीची सवय लागलेल्या शिक्षण विभागाने शाळा सील करण्याकडे दुर्लक्ष केले.शेवटी जिल्ह्यातील खाजगी संस्थाचालक आक्रमक झाले ,त्यांनी बुधवारी जिल्हा परिषदेत चार तास ठाण मांडले आणि अखेर जड अंतःकरणाने शिक्षण विभागाने या शाळेला सील लावले.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात नोकरीस असणारे सिरसाट नावाचे गृहस्थ यांनी आपल्या जागेत नारायणा स्कुल ची ब्रँच मागील वर्षी सुरू केली.स्वतः शिक्षण विभागात असून सुद्धा या महाशयांनी शाळेला कोणतीच परवानगी घेतली नाही.

शाळेला यु डायस नंबर नाही,शासनाची परवानगी नाही अशा तक्रारी झाल्यानंतर शिक्षण विभागाने थातूर मातूर चौकशी केली.शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी बोटचेपी भूमिका घेत शाळेला केवळ नोटीस पाठवल्याचे दाखवत कारवाई सुरू असल्याचे नाटक केले.

वास्तविक पाहता परवानगी नसलेल्या शाळेला दररोज दहा हजार रुपये याप्रमाणे दंड आकारून गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे,तसा नियम आहे,पण कुलकर्णी यांनी याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे.

दरम्यान या शाळेने यावर्षी पुन्हा प्रवेश प्रक्रिया सुरू केली.विशेष म्हणजे इतर इंग्लिश स्कुल कशा चांगल्या नाहीत,तेथे काय काय त्रुटी आहेत याबाबत या शाळेने पालकांना पटवून देण्यास सुरवात केली.त्यामुळे संतप्त झालेल्या खाजगी संस्थाचालकांनी याबाबत शिक्षण विभागाकडे तक्रार केली.परंतु नेहमीप्रमाणे त्यावर कारवाई झालीच नाही.

अखेर बुधवारी जिल्ह्यातील दीडशे च्या आसपास संस्थाचालक जिल्हा परिषद मध्ये दाखल झाले.साडेअकरा वाजता बैठक होईल असा निरोप देणारे अधिकारी तीन वाजता आले अन त्यानंतर नारायण स्कुल बंद करण्याचे आश्वासन मिळाले.या बैठकीनंतर शिक्षण विभागाने या शाळेला सील ठोकले असून पालकांनी प्रवेश घेऊ नये असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *