News & View

ताज्या घडामोडी

दगड द्या पण जरा धडाचा आकार असलेला द्या- नाईकवाडे !

बीड- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे माजी नगरसेवक अमर नाईकवाडे, फारूक पटेल,मोईन मास्टर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.2019 ला झालेली चूक यावेळी होणार नाही,सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय विधानसभा उमेदवारीचा निर्णय घेतला जाणार नाही असा शब्द यावेळी कृषिमंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला.

मंगळवारी बीड नगरपालिकेचे मा. गटनेते फारुक पटेल यांच्यासह बांधकाम सभापती आणि गटनेते म्हणून काम पाहिलेले अमर नाईकवाडे यांच्यासह मा. उपनगराध्यक्ष मोईन मास्टर, मा. नगरसेवक जलील पठाण, प्रभाकर पोपळे, मा. उपनगराध्यक्ष शेख शाकेर, माजी उपनगराध्यक्ष नसीम इनामदार, भैय्यासाहेब मोरे, माजी सभापती अशफाक इनामदार, गणेश तांदळे, शेख सादेक, माजी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक आघाडी बरकत पठाण, माजी नगरसेवक अक्रम बागवान, ऑल इंडिया मोमीन कॉन्फरन्सचे जिल्हाध्यक्ष शेख सादेक (अंबानी), माजी नगरसेवक शकिल (बिल्डर)खान, माजी नगरसेवक इलियास टेलर, अलिम कुरेशी, शेख युनुस, रफीक बागवान, अय्युब खान, शेख अजिम, सय्यद नदीम, बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अलिम पटेल, रामदास सरवदे, सय्यद रहीम, संतोष क्षीरसागर, शेख इलियास, संभाजी काळे, भैय्या पवळे, बाळु धोत्रे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मुंबईत पक्षाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

तत्पूर्वी बीड शहरातून तब्बल 300 वाहनांचा ताफा घेवून हे पदाधिकारी मुंबईत रवाना झाले. सर्व पदाधिकार्‍यांचा अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हा पक्ष प्रवेश सोहळा घडवून आणण्यासाठी माजी आ.अमरसिंह पंडीत यांनी सातत्याने पाठपुरावा केला. पक्षप्रवेशप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कृषी मंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार अमरसिंहजी पंडित, आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार संजय दौंड, जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, बजरंग बप्पा सोनवणे, नारायण बाप्पा शिंदे, जिल्हा सरचिटणीस अविनाश नाईकवाडे, तालुकाध्यक्ष महादेव उबाळे, शहराध्यक्ष बाळासाहेब गुजर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना अमर नाईकवाडे म्हणले की,ज्यावेळी अजितदादा आणि धनूभाऊंचा महायुती सरकारमध्ये शपथविधी झाला त्यावेळी खर्या अर्थाने इकडे बीडमध्ये आम्ही पण स्वतंत्र झालो. आम्हाला हक्काचे घर मिळाले, आम्ही इतके दिवस पक्षाचे काम केले, पण आमदार निवडून आल्यानंतर पक्ष विचारायला सुध्दा तयार नव्हता आम्हाला. पालकमंत्री धनंजय मुंडेंनासुध्दा भेटता येत नव्हतं, नगरच्या रेस्टहाऊसला जावून भेटावे लागले, मात्र धनंजय मुंडे यांनी आम्हा सर्वांना योग्य दिशा दिली म्हणून हे टिकून राहिले नाहीतर आज हे सर्वजण राजकीयदृष्ट्या दिशाहिन झाले असते. आमचा सतत फुटबॉल झाला.मात्र आम्ही पक्षासाठी प्रामाणिक काम करत आलोय. यापुढेही आम्ही एकनिष्ठेने काम करत राहू. अशी ग्वाही अमर नाईकवाडे यांनी दिली.

याप्रसंगी पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, आज पक्षात प्रवेश घेतलेले सर्व पदाधिकारी मागील 30 वर्षांपासून माझ्या जीवाभावाचे सदस्य आहेत.या सर्वांनी 2019 ते आजपर्यंत अनेक अडचणींचा सामना केला,मात्र आता या अडचणी थांबल्या आहेत. मी आपल्या सर्व अडचणी जाणतो असे सांगत धनंजय मुंडे म्हणाले, अजितदादा, तुम्ही मला यापूर्वी पालकमंत्री केले, पण बीडला जायलाच मला परवानगी नव्हती. उलट ती परवानगी मी तोडली तर माझ्या तक्रारी होण्याची भीती होती. पण मी या लोकांचा विश्वास तुटू दिला नाही. वास्तविक या सर्व पदाधिकार्यांशी माझा तीस वर्षांपासूनचा स्नेह आहे. दादाही आपलेच नेते आहेत. माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना घडवणारे नेते अजितदादा आहेत. यापुढे बीड विधानसभेचे जे-जे प्रश्न आहेत, ते आता सोडवण्यासाठी अजितदादांनी पुढाकार घ्यावा. बीड विधानसभेचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिकचा निधी अर्थमंत्री म्हणून अजितदादांनी द्यावा अशी मागणी त्यांनी केली. बीड शहरात विकासाची जी एक-एक विट रचली गेली, ती अजितदादांच्या सहकार्यामुळे रचली गेली असेही धनंजय मुंडे म्हणाले. लवकरच बीडमध्ये अजित पवारांची सभा होईल असेही ते म्हणाले.

यावेळी न.प.चे माजी सभापती अमर नाईकवाडे म्हणाले, 2016 ला अजितदादा दुष्काळ परिषदेला बीडला आले अन् बीडचे भाग्य बदलले. आज मला मर्म मांडायचे आहे, आम्ही सर्वसामान्य घरातून आलेलो सर्वजण आहोत. इथ यायचं कारण 2016 ते 2024 या कालावधीत आम्ही राजकीयदृष्ट्या होरपळून निघालो. यांनी इकडून मारायचं,त्यांनी तिकडून मारायचं, तरी आम्ही संयम सोडला नाही, आणि स्वत:ला विकलंही नाही.या आठ वर्षामध्ये आम्हाला पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आम्हाला आधार दिला, पण त्यांच्याजवळ आमचं म्हणण मांडायलासुध्दा आम्हाला 7 वर्ष लागले. आम्ही समोरच्यासोबत न्यायालयीन लढाई लढलो. धनभाऊंनी शब्द दिला होता की,घड्याळाचा उमेदवार निवडून आणायचा,सर्व तरुणांनी जिवाचं रानं केले. बीडचे हे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते अजितदादांवर खूप प्रेम करणारे आहेत, आजपर्यंत हे सगळे एकतर्फी प्रेम झाले. तुम्हाला यांनी माहितीच होवू दिले नाही की, आम्ही पण पक्षासाठी एकनिष्ठेने काम करतोय. असे म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *