News & View

ताज्या घडामोडी

बहिणीच्या विजयाची धुरा धनंजय मुंडेंनी घेतली खांद्यावर !

महायुतीच्या संकल्प मेळाव्यात एकजुटीचे प्रदर्शन !

बीड- नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुती मधील प्रत्येक कार्यकर्त्याने जीवाचे रान करावे,बीड लोकसभा मतदारसंघात बहिणीच्या विजयाची धुरा आपण आपल्या खांद्यावर घेतली आहे,विरोधात कोण आहे याचा अद्याप पत्ता नाही तरीही कार्यकर्त्यांनी गाफील न राहता मेहनत घ्यावी असे आवाहन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

    बीड शहरातील आशीर्वाद लॉन्समध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, शिवसंग्रामसह मित्र पक्षांचे जिल्हास्तरीय मित्रपक्ष संमेलन आणि कार्यकर्ता मेळावा रविवारी (दि.१४) पार पाडला.

    व्यासपीठावर खा. डॉ. प्रितमताई मुंडे, आ. प्रकाश सोळंके, बाळासाहेब आजबे, माजी मंत्री सुरेश नवले, शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे, मित्र पक्ष संमेलनाचे समन्वयक तथा माजी आमदार अमरसिंह पंडित, आर. टी. देशमुख, भीमराव धोंडे, संजय दौंड, रा.काँ.चे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, रमेश आडसकर, मोहन जगताप, सलीम जहांगीर, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खाडे, सचिन मुळूक, अनिल जगताप, रा.काँ.चे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर, शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष नारायण काशीद, गेवराई मतदारसंघाचे युवा नेते विजयसिंह पंडित, अनिल तुरुकमारे, प्रहारचे विलास कोळांके,भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांच्यासह आजी – माजी आमदार, मित्र पक्षांचे जिल्हाध्यक्ष, राज्य कार्यकारिणीचे विविध सेलचे पदाधिकारी, नेते उपस्थित होते.

    धनंजय मुंडे यांनी व्यासपीठावरील नेत्यांची गर्दी पाहून ‘माझीच नजर न लागो माझ्या वैभवाला’ म्हणत असेच एकत्र राहण्याचा सल्ला दिला. पुढे बोलताना ते म्हणाले, आपल्या एकजुटीमुळे डॉ. प्रितमताई मुंडे या देशात सर्वाधिक मतांनी विजयी होणाऱ्या खासदार ठरतील. बीड जिल्हा दुष्काळमुक्त व्हावा हे स्व. गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न होते. जिल्ह्याचे मागासलेपण घालवण्यासाठी पुन्हा सत्ता आणून विकासाची भूक भागवावी लागेल. आपली महायुती अभेद्य, अखंड आहे. बॅनरवर माझा फोटो नसला तरी चालेल, परंतु स्व. गोपीनाथ मुंडे यांचा फोटो असावा. त्यांचे विचार पुढील अनेक वर्ष जिवंत राहणार आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन गावपातळीवरील मतभेद सोडून द्या, सर्वजण एकत्र येऊन देशाच्या हितासाठी, प्रतिष्ठेसाठी महायुतीला साथ द्या, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले. जिल्ह्यासह मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट असून दुष्काळमुक्तीसाठी लागेल ते करू. कोट्यवधींचा निधी खेचून आणू. जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबध्द आहे, अशी ग्वाही देत गावापासून देशपातळीपर्यंतची महायुती मजबूत करावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच, महायुती लोकसभा निवडणुकीपुरतीच न राहता पुढेही विधानसभा निवडणुकीत अशीच अभेद्य रहावी, असे आवाहन मुंडे यांनी केले.


    आगामी निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी महायुती सज्ज – खा. डॉ. प्रितमताई मुंडे

    मी स्वतःहून लोकसभा निवडणुकीची उमेदवार आहे, असे नाव जाहीर करणार नाही. परंतु मित्र पक्षांच्या भावनेचा सन्मान ठेऊन मी लोकसभा निवडणुकीची उमेदवार म्हणून पुढे जात आहे. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पावलावर पाऊल ठेऊन बीड जिल्ह्याचे लोकसभेत खंबीरपणे प्रतिनिधीत्व करेन. परंतु हा निर्धार केवळ नेत्यांनी न करता महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना करावा लागेल. सबका साथ, सबका विकास हा स्व. मुंडे यांच्या जीवनाचा मूलमंत्र होता. आगामी निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी म्हटले. गत लोकसभा निवडणुकीत शिवसंग्राम पक्ष आपल्या सोबत नव्हता. परंतु यावेळी त्यांची साथ मिळाली असून स्व. विनायक मेटे यांचे स्वप्न करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. बीड जिल्ह्याच्या जनतेच्या मनात काय आहे हे मला कळते म्हणून प्रतिनिधीत्व करण्याची पुन्हा पुन्हा संधी मिळतेय. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल व्यक्त केलेल्या भावनेचा आपल्याला प्रचंड आदर आहे. त्यांच्या पश्चात त्यांची प्रतिष्ठा कायम आहे, हे गौरवास्पद आहे. स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या नावाशिवाय राज्यात भाजप असूच शकत नाही. तरीही प्रोटोकॉलच्या नावाखाली त्यांचा फोटो टाळणे उचित नाही. यापुढेही असे होऊ नये याची दक्षता सर्वांनी घ्यावी. कारण स्व. गोपीनाथ मुंडे हा जनभावनेचा विषय आहेत. भाजपच्या नमो चषक स्पर्धेच्या माध्यमातून जिल्हाभरात स्पर्धा सुरू आहेत. मी परळीत मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला. आता लोकसभेचीही शर्यत आपण जिंकू असा विश्वास डॉ. मुंडे यांनी व्यक्त केला. तसेच, महायुतीमधील मित्रपक्ष संमेलनाचे समन्वयक अमरसिंह पंडित यांच्या नियोजनाचे त्यांनी कौतुक केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *