News & View

ताज्या घडामोडी

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी 62 वस्तीगृहास मान्यता !

धनंजय मुंडे यांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता !

मुंबई- राज्यातील ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी वस्तीगृह सुरू करण्याच्या योजनेअंतर्गत तब्बल 62 वस्तीगृहास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे.कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून याबाबतचा शासन निर्णय जरी करण्यात आला आहे.

या योजनेंतर्गत राज्यात ऊसतोड कामगारांची संख्या अधिक असलेल्या 41 तालुक्यांची निवड करून त्यात 100 क्षमतेचे मुला-मुलींसाठी स्वतंत्र असे एकूण 82 वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय खात्याचे मंत्री असताना घेतला होता. तसेच त्यांच्या कार्यकाळात बीड, अहमदनगर व जालना जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 20 वसतिगृहे भाड्याच्या जागेत सुरू देखील करण्यात आली होती. यांपैकी आतापर्यंत 5 वसतीगृहांना स्वतःच्या जागेत इमारत बांधकामासाठी प्रत्येकी 10 कोटी रुपये निधी देखील शासनाने उपलब्ध करून दिला आहे.

त्यानंतर उर्वरित 62 वसतिगृहे सुरू करण्यात यावेत, याबाबत धनंजय मुंडे यांनी सध्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली होती. त्यानुसार आता आणखी 31 तालुक्यात 62 वसतिगृहे उभारण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. ही वसतिगृहे सुरुवातीस भाड्याच्या जागेत चालवली जाणार असून आगामी शैक्षणिक वर्षांपासून खुली करण्यात येतील, तसेच टप्प्याटप्प्याने वसतिगृहे स्वतःच्या जागेत इमारती उभारून चालवली जातील.

ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये यादृष्टीने ऊसतोड कामगारांच्या मुलांची शाळेसह निवास व भोजनाची उत्तम सोय व्हावी, या दृष्टीने ही वसतिगृहे अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. ऊसतोड कामगारांच्या पुढील पिढ्यांच्या हातात कोयता येऊ नये, या दृष्टीने शासनाचे हे अत्यंत मोठे पाऊल आहे. स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब व स्व.पंडित अण्णा मुंडे यांचे हे एक स्वप्न होते, आज हे स्वप्न महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करू शकलो, याचा मला अभिमान आहे, तसवच याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे हृदयपूर्वक आभार व्यक्त करतो, अशी भावुक प्रतिक्रिया कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी व्यक्त केली आहे.

या ठिकाणी सुरू होणार प्रत्येकी 2 वसतिगृहे –

बीड जिल्हा – वडवणी, धारूर, शिरूर कासार, आष्टी, अंबाजोगाई

अहमदनगर – शेवगाव

जालना – परतूर, बदनापूर, जालना, मंठा

नांदेड – कंधार, मुखेड, लोहा

परभणी – गंगाखेड, पालम, सोनपेठ

धाराशिव – कळंब, भूम, परांडा

लातूर – रेणापूर, जळकोट

छत्रपती संभाजी नगर – पैठण, सोयगाव, सिल्लोड

नाशिक – निफाड, नांदगाव, येवला, सिन्नर

जळगाव – एरंडोल, यावल, चाळीसगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *