News & View

ताज्या घडामोडी

चक्क न्यायालयाचीच फसवणूक !


बीड -स्वत:चा फायदा व्हावा यासाठी अज्ञाताने चक्क न्यायालयाच्या मूळ न्यायनिर्णायामधील न्यायालयाने ठरवून दिलेल्या बाजारभावामध्ये छेडछाड व फेरफार करुन वाढीव दर नमुद करत खोटे दस्ताऐवज बनवले. हे सर्व प्रकरण लक्षात आल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालय अधीक्षकांनी पोलीसात धाव घेत फिर्याद दिली. या प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत जिल्हा व सत्र न्यायालयाचे अधीक्षक नरेंद्र रामराव पाठक यांनी 24 डिसेंबर रोजी शिवाजीनगर पोलीसात फिर्याद नोंदवली आहे.2 जुलै 2016 ते 11 जानेवारी 2022 या कालावधीत दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर जिल्हा व सत्र न्यायालय, बीड येथे अज्ञात आरोपीने स्वतःच्या फायद्यासाठी न्यायालयाच्या मुळ न्यायनिर्णयामधील न्यायालयाने ठरवून दिलेल्या बाजारभावामध्ये छेडछाड व फेरफार करुन वाढीव दर नमुद करुन खोटे दस्ताऐवज बनवले. तसेच मूळ न्याय निर्णयातील पान क्रमांक 09, 10, 17, 19, 20 आणि 25 हे बदलले आहे. मूळ न्याय निर्णय आणि दुसरा बदललेला निर्णय यात अनेक ठिकाणी विसंगती आढळून आल्या आहेत. एकंदरच या प्रकरणामुळे खळबळ उडाली असून या प्रकरणी अज्ञातावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कलम 420, 465, 467, 468, 471, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


महत्वाचे म्हणजे, शासकिय कार्यालयातील कागदपत्रात छेडछाड करण्याचे प्रकार यापुर्वीही जिल्ह्यात घडलेले आहेत. मात्र न्यायालयातील न्यायनिर्णयात छेडछाड करण्याचा हा पहिला प्रकार असल्याचेसमोर आले असून असा प्रकार करण्यात नेमका कुणाचा सहभाग आहे. पोलीस तपासातून समोर येणार आहे.प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल गुरले करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *