News & View

ताज्या घडामोडी

निलंबित कर्मचाऱ्याचा मृत्यू ! नातेवाईकांनी मृतदेह आणला नगर पालिकेत !

गेवराई – नगर पालिकेतील कर्मचारी सोमनाथ राऊत यांना विना चौकशी निलंबित करून सन २०२० पासून सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. पुन्हा नोकरीवर रुजू करून घेण्याची मागणी निलंबित कर्मचाऱ्याने वारंवार पालिकेकडे केली. मात्र राजकीय दबावापोटी त्यांना नोकरीवर रुजू करून घेण्यात आले नसल्याचा गंभीर आरोप मयत कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांनी केला. गुरुवारी त्यांचे आजाराने निधन झाल्यानंतर नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह थेट गेवराई नगर पालिकेतील मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर आणून ठेवल्याने शहरात खळबळ माजली. अनेक तास उलटूनही नातेवाईकांना आश्वासन मिळत नसल्यामुळे अखेर विजयसिंह पंडित यांनी प्रकरणात मध्यस्थी केली. मयताच्या वारसाला अनुकंपा तत्वावरील नोकरी आणि त्यांच्या उर्वरित वेतनाची देयके सात दिवसांत अदा करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर मृतदेह पालिकेत बाहेर नेण्यात आला. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त होता.

या प्रकरणानंतर निलंबित कर्मचाऱ्याला नोकरीवर हजर न होवू देण्यासाठी कोणाचा राजकीय दबाव होता ? असा सवाल विजयसिंह पंडित यांनी उपस्थित केला.सोमनाथ लक्ष्मणराव राऊत, वय ५०, राहणार गेवराई हे गेवराई नगर परिषदेतील स्वच्छता विभागात लिपिक पदावर काम करत होते. सन २०२० मध्ये त्यांना पालिकेने विना चौकशी निलंबित करून सक्तीच्या रजेवर पाठविले होते. पुन्हा नोकरीवर रुजू करावे अशी मागणी ते पालिकेकडे वारंवार करत होते, मात्र त्यांना पालिकेने नोकरीवर रुजू करून घेतले नाही. दरम्यान वेतन नसल्यामुळे सोमनाथ राऊत व त्यांच्या कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आली. त्यातच आजार पणामुळे गुरुवार, दि.२१ डिसेंबर रोजी त्यांचे आजारपणामुळे निधन झाले.

त्यांच्या मृत्युनंतर नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह गेवराई नगर पालिकेने मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमारे आणून ठेवला. प्रशासक तथा मुख्याधिकारी यांच्यासह एकही जबाबदार अधिकारी पालिकेत उपस्थित नसल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांना कोणाकडूनही ठोस आश्वासन मिळू शकले नाही. सोमनाथ राऊत यांच्या नातेवाईकांनी केलेल्या आक्रोषामुळे परिसरातील वातावरण गंभीर झालेले होते. थेट मुख्याधिकाऱ्याच्या दालनासमोर मृतदेह ठेवल्यामुळे शहरात खळबळ पसरली होती.

मयत कर्मचारी सोमनाथ राऊत यांच्या पत्नी व मुलांनी पत्रकारांना माहिती देताना राजकीय दबावामुळे त्यांना पुन्हा नोकरीत सामावून घेण्यात आले नसल्याचा गंभीर आरोप केला. बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी या प्रकरणात अखेर मध्यस्थी करून मृताच्या नातेवाईकांचे सांत्वन करून त्यांना समजावण्याचा यशस्वी प्रयत्न केला. नगर पालिकेतील कार्यालयीन अधिक्षक तृप्ती तळेकर यांना लेखी आश्वासन देण्याची विनंती विजयसिंह पंडित यांनी केली. मृताच्या वारसाला अनुकंपा तत्वावर नोकरी आणि त्यांचा नियमाप्रमाणे होत असलेला पगार सात दिवसांत देण्याचे लेखी आश्वासन तृप्ती तळेकर यांनी दिले. विजयसिंह पंडित यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे अखेर मयत कर्मचाऱ्याचा मृतदेह पालिकेतून बाहेर नेण्यात आला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना विजयसिंह पंडित म्हणाले की, गेवराई शहराला काळीम फासणारी ही घटना असून कोणाच्या राजकीय दबावाचा हा बळी आहे याचा शोध घेण्याची गरज आहे. जीवंतपणी मरण यातना देणाऱ्यांनी किमान मृत्यु पश्चात तरी त्याची अवहेलना होवू देणे योग्य नव्हते. आता या मंडळींच्या पापाचा घडा भरला असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *