News & View

ताज्या घडामोडी

दिग्गज नेते ठाण मांडून ! बाजार समितीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष !!

बीड- शेतकरी,व्यापारी आणि हमाल यांच्याशी निगडित असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला यंदा मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. बीड जिल्ह्यातील परळीत माजीमंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे बहीण भाऊ,तर बीडमध्ये आ संदिप क्षीरसागर आणि माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर हे काका पुतण्या मतदान केंद्रावर ठाण मांडून बसल्याचे चित्र पहावयास मिळाले. ही निवडणूक आगामी विधानसभेची रंगीत तालीम समजली जात असल्याने सर्वांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांची घोषणा झाली आणि या ठिकाणी आपली सत्ता राखण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी कंबर कसली.बीड जिल्ह्यात आष्टी आणि कडा बाजार समिती बिनविरोध काढून भाजपचे आ सुरेश धस यांनी पहिला मान पटकावला.परळी मध्ये माजीमंत्री धनंजय मुंडे आणि माजीमंत्री पंकजा मुंडे यांच्या दोन पॅनल मध्ये सरळ लढत आहे.

दुसरीकडे बीड बाजार समितीमध्ये कधी नव्हे ते एवढे महत्व आल्याचे पहावयास मिळाले. माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या ताब्यातील बाजार समिती आपल्याकडे घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आ संदिप क्षीरसागर यांनी भाजप,शिवसेना,शिवसेना उद्धव ठाकरे गट,शिवसंग्राम ,शेतकरी संघटना यांना सोबत घेत पॅनल उभा केले.

शुक्रवारी मतदान केंद्रावर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे मतदारांचे नाव शोधून देण्यापासून ते मतदारांना फोन करून मतदानाला बोलावून घेण्यापर्यंत स्वतः काम करत असल्याचे दिसून आले.बीडमध्ये माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर हे आपल्या माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यासोबत मंडपात खुर्ची टाकून बसल्याचे दिसले.तर आ संदिप क्षीरसागर हे ट्रॅव्हल्स मधून आलेल्या मतदारांना स्वतः रिसिव्ह करत असल्याचे पाहायला मिळाले.

एकूणच या निवडणुकीत दिग्गज नेते ही संस्था ताब्यात घेण्यासाठी कामाला लागले असून नेमकी सत्ता कोणाची येणार हे शनिवारी मतमोजणी नंतर समजेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *