पाटोदा- नगरपंचायत स्थापना झाल्यानंतर तब्बल एक वर्ष पूर्वीच्या ग्रामपंचायतचे पाणीपुरवठा व स्वच्छता समिती बँक खाते हस्तांतरित केले आहे.या दरम्यानच्या काळात बेकायदेशीरपणे २० लक्ष ४० हजार रुपये कोणी आणि कशासाठी उचलले याचे गोडबंगाल कायम आहे.यामध्ये मोठ्या प्रमाणावर अपहाराची दाट शक्यता असून सदरील प्रकरणी शिवभूषण लक्ष्मणराव जाधव, अबलूक घुगे व शेख मोबीन यांनी सचिव नगर विकास, सचिव ग्राम विकास, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी बीड व लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शिवभूषण जाधव व अबलूक घुगे यांनी तक्रारीत म्हटले आहे कि दि.०१/०३/२०१४ रोजी महाराष्ट्र शासनाने घोषित केल्याप्रमाणे पाटोदा ग्राम पंचायतचे नगर पंचायतमध्ये रुपांतर झाले व दि.०८/०४/२०१५ रोजी प्रशासकाने नगर पंचायत पाटोदाचा कार्यभार स्वीकारला हे सर्व होत असताना पूर्वीच्या ग्रामपंचायतची सर्व खाते अभिलेखे नगरपंचायत पाटोदाकडे हस्तांतरित होणे कायद्याने बंधनकारक आहे परंतु पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे कोट्यावधी रुपये असल्याने बँक खाते तब्बल एक वर्ष हस्तांतरित केले नाहीच परंतु दरम्यानच्या काळात त्या खात्यातून २० लक्ष ४० हजार रुपये बेकायदेशीरपणे उचलले गेले. तसेच पूर्वीच्या ग्राम पंचायत काळातील अपूर्ण राहिलेल्या पाणीपुरवठा कामाचे बील शिवाजीनगर पाईपलाईनसाठी एकूण ९८ लक्ष ५५ हजार रुपये हुले कंस्टक्शनला देण्यात आले.
तसेच पाटोदा अंतर्गत बेलेवाडी गावासाठी नवले कंस्टक्शनला २२ लक्ष ८० हजार रुपये देण्यात आले. दिलेली रक्कम २०१५-१६ च्या लेखापरीक्षण अहवालानुसार १३ व्या वित्त आयोगातून दिले गेले आहे. वास्तविक पाहता पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी आलेले पैसे पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या खात्यावर असतात. ते १३ व्या वित्त आयोगातून कसे दिले गेले. त्यातच पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे बँक खाते सदर काळात हस्तांतरित केलेले नाही. मग एकाच कामाचे दोनदा पैसे उचलले गेले काय याची शंका निर्माण होते.
तसेच या सर्व उचलल्या पैशाचे व एकूणच पाणीपुरवठा व स्वच्छता कमिटीचे कसलेच रेकॉर्ड नगरपंचायतकडे उपलब्ध नाही. ते उपलब्ध नसल्याबाबत, पाटोदा नगरपंचायतने राज्य माहिती आयोगाला, शिवभूषण लक्ष्मणराव जाधव यांच्या माहिती अधिकारातील कलम १८(१) तक्रारीवर सुनावणी दरम्यान म्हटले आहे. सुनावणीअंती सदर रेकॉर्ड नसल्यामळे मा.राज्य माहिती आयोगाने मा.जिल्हाधिकारी बीड यांना जबाबदारी निश्चित करून रेकॉर्ड ACT खाली कारवाई करण्याचे देखील आदेशित केले आहे, सदर उचलेल्या पैशाचे रेकॉर्ड लेखापरीक्षणास सुद्धा लेखापरीक्षण उपलब्ध करून दिले नाही. एकूणच हा प्रकार संगनमताने केलेला अफरातफरीचा अपहाराचा असल्याचा वाटतो म्हणून त्याची चौकशी करून दोषीवर कारवाही व्हावी. अशी मागणी शिवभूषण लक्ष्मणराव जाधव, अबलूक घुगे व शेख मोबीन यांनी केली आहे.
Leave a Reply