News & View

ताज्या घडामोडी

अगोदर काम केले अन आता प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेचा डाव !

स्वच्छ भारत मिशनकडे पाठक यांनी लक्ष घालावे !!

बीड- जिल्हा परिषदेच्या अनेक सुरस कथा अजित पवार यांच्या बदलीनंतर उघडकीस येत आहेत.स्वच्छ भारत मिशन योजनेच्या कार्यालयाच्या दुरुस्तीवर तब्बल सात लाखाचा खर्च महिनाभरापूर्वी करण्यात आला. मात्र याची तांत्रिक मान्यता आता घेतली गेली आहे.या खर्चाला मान्यता देण्याच्या पत्रावर तत्कालीन सीईओ पवार यांच्या डुप्लिकेट सह्या केल्याची देखील माहिती आहे.या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीईओ अविनाश पाठक यांनी करण्याची गरज आहे

बीड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्र 2 च्या कार्यालयात स्वच्छ भारत मिशन योजनेचे कार्यालय गेल्या काही दिवसापासून सुरू आहे.या कार्यलयात उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासह कर्मचाऱ्यांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. येथून जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन चे काम पार पडते.

या कार्यालयाच्या दुरुस्तीची फाईल महिना दीड महिन्यांपूर्वी फिरवण्यात आली.तत्कालीन सीईओ अजित पवार यांनी कार्यलयात एसी बसवणे,फर्निचर डागडुजी ,खुर्च्या खरेदी,रंगकाम व इतर कामांसाठी सात लाख रुपयांच्या खर्चाला 4 ऑगस्ट2023 रोजी प्रशासकीय मंजुरी दिल्याचे दाखवले गेले.मात्र या पत्रावरील सीईओ पवार यांची सही बोगस असल्याची चर्चा आहे.

दरम्यान सात लाख रुपये खर्च करण्याची परवानगी 4 ऑगस्ट रोजी दिली असल्याचे पत्र असले तरी या कामाची तांत्रिक मंजुरी शुक्रवारी 15 सप्टेंबर रोजी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कोणतेही प्रशासकीय काम मंजूर करताना अगोदर तांत्रिक मंजुरी नंतर प्रशासकीय मंजुरी घेतली जाते आणि त्यानंतर काम केले जाते.स्वच्छ भारत मिशन मध्ये मात्र अगोदर काम केले गेले,त्यानंतर प्रशासकीय मान्यता घेतली गेली आणि आता तांत्रिक मान्यता घेतली गेली आहे.

या कामाकडे आणि फाईलचा उलटा प्रवास करून आपले खिसे गरम करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडे नवे सीईओ अविनाश पाठक यांनी लक्ष देणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *