News & View

ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांच्या नावाखाली अधिकाऱ्यांची अमेरिकेला फॅमिली ट्रिप !

अकरा विद्यार्थ्यांसाठी दहा बारा अधिकारी शासकीय खर्चाने सहकुटुंब करणार परदेश दौरा !

बीड- बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळांमधून निवड झालेले अकरा विद्यार्थी थेट नासा ला भेट देणार आहेत.यापूर्वी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी इस्रो ची पाहणी केली होती.आता थेट अमेरिकेत जायची संधी मिळणार असल्याने या संधीचा फायदा जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी देखील घ्यायचे ठरवले आहे.शासनाच्या पैशावर ज्यांचा विज्ञान किंवा शिक्षण विभागाशी संबंध नाही असे अधिकारी अमेरिका टूर करणार आहेत अन ते ही सहकुटुंब. एकप्रकारे शासनाच्या पैशावर डल्ला मारण्याचाच हा प्रकार म्हणावा लागेल.

बीड जिल्हा परिषदेच्या शाळेतील अकरा विद्यार्थी अमेरिकेत थेट नासा ला भेट देऊन अभ्यास करणार आहेत.विज्ञान आणि वैज्ञानिक प्रयोग यामध्ये रस अन रुची असणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतल्यानंतर अकरा जणांची निवड या दौऱ्यासाठी झाली आहे.

यापूर्वी जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळांमधून काही विद्यार्थी इस्रो ची पाहणी करून आले होते.त्यामुळे आता थेट नासा ला भेट देण्याची संधी मिळणार असल्याने विद्यार्थी स्वतःला नशीबवान समजत आहेत.या संपूर्ण दौऱ्याचा खर्च राज्य सरकार करणार आहे हे विशेष.

अमेरीकेत विद्यार्थ्यांना घेऊन जायचे तर हा संपूर्ण विषय शिक्षण विभागाशी संबंधित आहे.त्यामुळे या दौऱ्यात विज्ञान ,गणित विषयाचे तज्ञ शिक्षक, शिक्षणाधिकारी असणे अपेक्षित आहे.परंतु मेलेल्या मड्याच्या टाळूवरच लोणी खायची सवय लागलेल्या बीड जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी फुकटात अमेरिका वारी घडणार हे कळताच आपापल्या बॅगा भरून ठेवल्या.

बीड जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, माजी शिक्षणाधिकारी विक्रम सारूक,बदली होऊन रजेवर गेलेले वित्त व नियोजन अधिकारी जटाळे, महिला बाल कल्याण चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकान, एक महिला वैद्यकीय अधिकारी असे लोक या दौऱ्यात जाणार आहेत.

अकरा विद्यार्थी जर जाणार असतील तर त्यांच्यासोबत चार अधिकारी,तज्ञ शिक्षक जाणे अपेक्षित आहे नव्हे तसे शासनाचे आदेश आहेत.मात्र शासनाचे आदेश फाट्यावर मारण्याची सवय झालेल्या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी हा अमेरिकेचा दौरा सहकुटुंब ठरवला आहे.त्यासाठी काम धाम सोडून हे अधिकारी दोन दिवस व्हिसा काढण्यासाठी मुंबईत तळ ठोकून होते.

या दौऱ्यात सीईओ,एडिशनल सीईओ,डेप्युटी सीईओ,बदली झालेलं कॅफो ,विक्रम सारूक यांचा काहीच संबंध नाही.मग तरीही हे अधिकारी शासनाच्या खर्चावर मजा मारायला कसकाय निघाले अशी चर्चा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *