News & View

ताज्या घडामोडी

dr. nagoji chavhan

डॉ नागेश चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल!कोविड काळातील खरेदी भोवली!

बीड -कोविड काळात जिल्हा रुग्णालयात गरजेचं नसताना साहित्य खरेदी केल्याचे दाखवून तब्बल 17 कोटी 72 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नागेश चव्हाब यांच्यासहित सात जणांवर जळगाव जिल्ह्यातील यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. डॉ चव्हाण सध्या उदगीर येथे कार्यरत आहेत. तत्पूर्वी ते बीडला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून कार्यरत होते.

नाशिक मंडळ आरोग्य सेवा उपसंचालकांच्या स्तरावर झालेल्या चौकशीत हा प्रकार समोर आला. चौकशी अहवालाच्या आधारे डॉ. नागोराव चव्हाण, डॉ. यू. बी. तासखेडकर, लेखा अधीक्षक हरीपाल आर. वाणी, अभिलेखापाल मिलिंद निवृत्ती काळे, डॉ. बाबुलाल भंगा बारेला, सुधाकर दगडू चोपडे आणि नाशिक येथील मे. गृहलक्ष्मी महिला औद्योगिक संस्था मर्यादितचे अध्यक्ष अशा सात जणांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४०९, ४२० आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौकशीमध्ये कोविड काळात साबण, टेबल क्लॉथ, झाडू, टॉर्च सेल, फायर एक्स्टिंग्विशर आणि सॅनिटायझर यांसारख्या वस्तूंची मागणी नसतानाही खरेदी केल्याचे समोर आले. प्रादेशिक प्रमुखाला एक लाख रुपयांपर्यंतचे वित्तीय अधिकार असताना त्यापेक्षा मोठ्या रकमेची खरेदी केल्याचेही अहवालात नमूद आहे.सन २०२० मध्ये ई-निविदा काढण्यात आली होती. तीन संस्थांपैकी दोन संस्था अपात्र ठरल्यानंतरही एकमेव पात्र संस्थेचा आर्थिक लिफाफा उघडून तिला कार्यारंभ आदेश देण्यात आल्याचा आरोप आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे प्रभारी प्रशासकीय अधिकारी डॉ. मनोज मंगल पाटील यांनी १९ नोव्हेंबर रोजी याबाबत तक्रार दिली.

संबंधित संस्थेकडून सुरक्षा ठेव घेण्यात आली नाही तसेच करारनामा करण्यात आला नसल्याचे चौकशीत आढळले. खरेदी आदेश आणि इनव्हॉइसमधील मापांमध्ये तफावत असतानाही पडताळणी न करता बिले अदा करण्यात आल्याचे अहवालात नमूद आहे. २१ रुग्णालयांना १०५ वस्तू पुरविण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष पुरवठ्यात मोठी तफावत आढळून आली.
जिल्हा रुग्णालय स्तरावरील खरेदीची बिले यावल ग्रामीण रुग्णालयाच्या स्तरावरून पारित करण्यात आल्याचे चौकशीत समोर आले. विशेष म्हणजे, जुलै २०१८ नंतर व्हॅट बंद झालेला असतानाही व्हॅट आकारलेली बिले अदा करण्यात आली. तसेच अनेक बिलांमध्ये सरसकट १८ टक्के जीएसटी आकारण्यात आल्याचेही नमूद आहे.या प्रकरणात शासनाची फसवणूक करून १७ कोटी ७२ लाख ६७ हजार ९६४ रुपयांचा अपहार केल्याचा आरोप असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ त्र्यंबक धारबळे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *