बीड – खोटी वैयक्तिक मान्यता आणि खोटे शालार्थ आयडी तयार करून शासनाची फसवणूक करणाऱ्या परळी वैद्यनाथ येथील पाच शिक्षकांना शिक्षण उपसंचालक यांनी मोठा दणका दिला आहे. वैद्यनाथ प्राथमिक विद्यालयातील पाच शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता रद्द करत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश उपसंचालकांनी दिल्यामुळे खळबळ उडाली आहे मात्र या प्रकरणात या शिक्षकांचे बोगस शालार्थ आयडी काढून त्यांना वेतन मिळण्यासाठी मदत करणारे युनिटचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी व शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांवर कुठलीच कारवाई करण्यात न आल्याने उपसंचालक मॅनेज झाले की काय अशी देखील चर्चा होत आहे.
परळी येथील वैद्यनाथ प्राथमिक विद्यालयात एक मुख्याध्यापक आणि पाच शिक्षक एवढीच पदे मंजूर असताना तब्बल 15 पदे भरल्याचे दाखवून शासनाची फसवणूक होतं असल्याची तक्रार करण्यात आली होती. याबाबत चौकशी समिती स्थापन झाली, त्यानंतर सबंधित शिक्षक हे न्यायालयात गेले. न्यायालयाच्या निर्देशनुसार उपसंचालक कैलास दातखीळ यांनी सप्टेंबर महिन्यात याबाबत सुनावणी घेतली आणि या शाळेचे पाच बोगस्स शिक्षक यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
नेमकं प्रकरण काय………!
परळी येथील वैद्यनाथ विदयालय येथे नोकरीस असलेल्या आणि अतिरिक्त ठरलेल्या पाच शिक्षकांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी सादर केलेल्या अहवालात या प्रकरणातील मोठा आणि धक्कादायक भाग म्हणजे, संबंधित ५ शिक्षकांच्या सन २०१३ मधील वैयक्तिक मान्यता आदेशांची पडताळणी करण्यासाठी शिक्षण विभागाकडे किंवा शाळेत तत्कालीन जावक रजिस्टरच उपलब्ध नव्हते. ज्या रजिस्टरमध्ये अधिकृत नोंदी असणे बंधनकारक असते, ते मूळ रजिस्टरच गायब झाल्यामुळे या मान्यतांची खात्री कशी पटणार? असा प्रश्न उपस्थित झाला.
फक्त कागदपत्रांचा घोळ इथेच संपत नाही, तर मुख्याध्यापक तथा गटशिक्षणाधिकारी, परळी वैजनाथ यांनी सादर केलेल्या अहवालानुसार हे संबंधित पाचही शिक्षक १० सप्टेंबर २०२५ पासून शाळेत कधीही उपस्थित नव्हते. त्यांच्या नावापुढे शालेय हजेरीपटावर कोणतीही नोंद नाही आणि त्यांचे कोणतेही वेतनही मागविले गेले नाही. तसेच, १० सप्टेंबर २०२५ पूर्वी हे शिक्षक खरोखरच शाळेत कार्यरत होते का? याबाबतचे कोणतेही कायदेशीर किंवा अधिकृत कागदपत्र शाळेत वा कार्यालयात उपलब्ध नसल्याचे समोर आले.
दरम्यान या प्रकरणांमध्ये बोगस अप्रुव्हल आणि बोगस शालार्थ आयडी काढून शासनाची फसवणूक करणाऱ्या पाच शिक्षकांना घरचा रस्ता दाखवला गेला असला तरी या पाच शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेच्या प्रस्तावावर ज्या शिक्षणाधिकाऱ्यांनी सह्या केल्या तसेच त्यांचे बोगस शालार्थ आयडी काढून त्यांचे वेतन काढण्यासाठी प्राथमिक विभागाच्या वेतन अधीक्षक व कर्मचाऱ्यांनी त्यांना मदत केली त्यांच्यावर कोणतीच कारवाई उपसंचालक दातखिळ यांनी प्रस्तावित केलेली नाही हा प्रकार म्हणजे आपल्या विभागातील अधिकाऱ्यांना वाचवण्याचाच प्रकार आहे आणि त्यामुळे दातखिळ यांनी शिक्षकांवर कारवाई करताना आपल्या अधिकाऱ्यांना मॅनेज झाले की काय अशी चर्चा होत आहे.
कुठल्याही कायदेशीर प्रक्रियेत किंवा मान्यतेसाठी प्रस्ताव वेळेत सादर करणे बंधनकारक असते. मात्र, या प्रकरणात शालार्थ प्रणालीत नाव दाखल करण्यासाठी तब्बल १० वर्षांपेक्षा जास्त अवधी लोटल्यानंतर प्रस्ताव सादर करण्यात आला. विशेष म्हणजे इतका विलंब का झाला? यावर शिक्षण विभागाकडून खुलासा मागितला असता संबंधितांनी कोणताही समाधानकारक उत्तर किंवा या संदर्भातील पुरावा सादर केला नाही.
वैद्यनाथ विद्यालयात बोगस वैयक्तिक मान्यता दाखवून वेतन उचलणाऱ्या शिक्षकांसोबत वेतन अधीक्षक प्राथमिक विभाग तसेच तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी आणि इतरांवरही निलंबनाची कारवाई होऊन गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे.
शाळा आणि प्रशासकीय पातळीवरील खाडाखोडी, व्हाईटर्नरचा वापर आणि मागच्या तारखांमध्ये बोगस नोंदी करण्याचे प्रकार याआधीच चव्हाटऱ्यावर आले होते. या सर्व गोष्टींची गांभीर्याने दखल घेत, मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकाऱ्यांचे अहवाल तसेच प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे स्पष्ट अभिप्राय ग्राह्य धरून विभागीय शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर यांनी मोठा कायदेशीर बडगा उगारला आहे. वैद्यनाथ प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ (जि. बीड) येथील माने अंकुश बालाजी, चव्हाण संतोष साहेबराव, आनकाडे रामदास गोविंदराव, देवकते गजानन सुभाष, देशमुख गजेंद्र रावसाहेब या सहशिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता तत्कालिन प्रभावाने रद्द करण्यात आल्या आहेत.



Leave a Reply