बीड -पटसंख्या मॅनेज करून शिक्षकांचे पद वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांची खरेदी विक्री केल्याप्रकरणी दोषी आढळून आलेले चंपावती शाळेचे मुख्याध्यापक सारंग जोशी यांच्यावर नीलम्बनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.
पटसंख्या नोंदणी पूर्ण करण्यासाठी 30 सप्टेंबर ही डेडलाईन असल्यामुळे चंपावती प्राथमिक शाळेने तीन विद्यार्थी उत्तराखंड येथून 28 सप्टेंबर रोजी विकत घेतले त्यामध्ये प्रिन्स रामचंद्र विश्वकर्मा, अर्णव रामभवन वर्मा आणि आर्यन चंद्रशेखर या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे विद्यार्थी आपल्या शाळेत शिकत असल्याचे दाखवून चंपावती शाळेने तसा अहवाल ऑनलाईन सादर केला आणि अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकाला वाचवले.
या प्रकरणी न्यूज अँड व्यूज ने पाठपुरावा केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या बीडच्या शिक्षण विभागाने शाळेला भेट देत तपासणी केली. या तपासणीत शाळेचे मुख्याध्यापक सारंग जोशी हे दोषी आढळून आले. त्याबाबतचा सविस्तर अहवाल शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी शुक्रवारी शिक्षण संचालक यांच्याकडे पाठवला होता.
सोमवारी सकाळी मुख्याध्यापक जोशी यांच्यावर नीलम्बनाची कारवाई करण्यात आली. चंपावती शाळेसारख्या नावाजलेल्या शाळेत झालेल्या या प्रकाराने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शिक्षण विभागाच्या तपासणीत मुख्याध्यापक जोशी हे दोषी आढळून आले मात्र त्यांनी जो काही अहवाल दिला किंवा माहिती भरली ती केंद्रप्रमुख म्हणून तपासण्याची जबाबदारी ही श्रीमती कागदे यांची होती. त्यांच्यावर मात्र अद्याप कसलीच कारवाई झालेली नाही हे विशेष.




Leave a Reply