News & View

ताज्या घडामोडी

20260926 184108 scaled

उपमुख्यमंत्री पवार, मंत्री मुंडे शेतकऱ्याच्या बांधावर!

बीड -राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी बीड जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थिती चा आढाव थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन घेतला. यावेळी त्यांनी सरकारने दुष्काळ जाहिर केल्याची माहिती देत शासन खंबीरपणे पाठीशी असल्याचा शब्द दिला.


पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला असून, उभ्या पिकांचे नुकसान होत असताना त्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. झालेल्या नुकसानाची योग्य ती दखल घेऊन, सर्वतोपरी मदत देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि टंचाईची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी त्यांनी दौऱ्यादरम्यान माजलगाव व गेवराई तालुक्यातील विविध गावांना भेट दिली. यावेळी त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली आणि ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

    मदत व पुनर्वसन विभागामार्फत २५ सप्टेंबर रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून, याद्वारे राज्यातील खरीप हंगामातील Trigger-१ (प्रथम कळ) लागू झालेल्या एकूण २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील सर्व ११ तालुके (बीड, गेवराई, माजलगाव, केज, आंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर आणि वडवणी) दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
    या शासन निर्णयानुसार दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी शासनाकडून खालीलप्रमाणे विविध विशेष उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत:

    • जमीन महसूलात सूट देण्यात आली आहे.
    • पिक कर्जाचे पुनर्गठन केले जाणार आहे.
    • शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे.
    • कृषी पंपांच्या चालू वीज बिलात सूट लागू करण्यात आली आहे (७.५ हॉर्सपावर पर्यंतचे वीज बिल अगोदरच माफ असल्यामुळे त्यावरील पंपांना ही सवलत लागू राहील).
    • शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी देण्यात आली आहे.
    • रोहयो अंतर्गत कामांच्या निकषात शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरू करण्याचे निर्देश आहेत.
    • आवश्यक त्या ठिकाणी पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर्सचा वापर केला जाणार आहे.
    • टंचाई जाहीर केलेल्या गावांमधील शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची वीज जोडणी खंडित न करण्याचे आदेश आहेत.
    • शेतीवर आश्रित शेतकरी व मजुरांना अन्नधान्याची टंचाई भासणार नाही याची व्यवस्था उभी केली जात आहे.
    • जनावरांसाठी आवश्यक चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे.
    • जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात येत आहेत.
    • पिण्याच्या पाण्याचे आणि जनावरांच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
      दौरादरम्यान पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी माजलगाव तालुक्यातील माली पारगाव, वारोळा, धर्मेवाडी तसेच गेवराई तालुक्यातील सिरसदेवी या गावांना भेट दिली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *