गेवराई -अवैध वाळू उपसा सुरु ठेवण्यासाठी तब्बल 70 हजाराची लाच स्वीकारताना तलाठी विलास मोराळे याला छत्रपती संभाजीनगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे हे अगोदरच वाळू चोरी प्रकरणात सक्तीच्या रजेवर असताना आता तलाठी पकडला गेल्याने खळबळ उडाली आहे.
गेवराई तालुक्यातील गोदाकाठ हा वाळू उपसा करण्यासाठी वाळू माफियांना महसूल प्रशासनाने आंदन दिला आहे. ऑगस्ट 25 ते जून 26 दरम्यान तहसीलदार संदीप खोमणे यांनी शंभर कोटी रुपयांची वाळू उपसा केली होती. या प्रकरणी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या चोकशीत दोषी आढल्याने तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस आणि ब्रोकर यांच्यासह तब्बल 19 लोकांवर गुन्हा दाखल झाला होता. यापैकी बहुतांश आरोपीला अद्याप अटक झालेली नाही.अशातच आता ही कारवाई झाल्याने प्रशासनातील खाबुगिरी उघड झाली आहे.
अवैध वाळू वाहतुकीसाठी सहकार्य करण्याच्या बदल्यात मोराळे यांनी संबंधिताकडे लाचेची मागणी केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर तक्रारीची पडताळणी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. 70 हजार रुपयांची लाच स्वीकारताना मोराळे यांना पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई छत्रपती संभाजीनगर पथकातील भास्कर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणी संबंधित तलाठ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महसूल विभागातील अधिकार्यावर झालेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, गेवराई तालुक्यातील अवैध वाळू उपशाचा मुद्दा यापूर्वीच चर्चेत आला आहे. घरकुल लाभार्थ्यांसाठीच्या वाळूसह अवैध वाळू उपशाच्या प्रकरणात महसूल विभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. अवैध वाळू उपशाच्या प्रकरणामुळे तहसीलदार संदीप खोमणे यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार असतांना पुन्हा ही कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.




Leave a Reply