बीड – बीडच्या जिल्हा हिवताप कार्यालयात हिवताप अधिकारी डॉक्टर विजयसिंह शिंदे कर्मचारी जीवन सानप या दोघांनी थकीत वेतन देयकाचे बोगस कागदपत्र सादर करत पाच ते सात कर्मचाऱ्यांच्या नावावर तब्बल 89 लाख रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे या प्रकरणात हिवताप अधिकारी डॉक्टर शिंदे यांना निलंबित केले आहे मात्र याचा मास्टरमाईंड असणारा जीवन सानप आणि इतर कर्मचारी मात्र अद्यापही मोकाटच का आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे.
बीड जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यात अनेक शासकीय कार्यालयांमधून वेतन फरक देयके दाखल करताना मोठ्या प्रमाणात वेतनाचे अतिरिक्त प्रधान अर्थात अधिकचे वेतन दिले गेल्याची बाब छत्रपती संभाजीनगर येथील लेखा आणि कोषागार कार्यालयाच्या सहसंचालक यांच्या लक्षात आली. त्यांनी याबाबत सर्वच विभागाना तपासणी करण्याचे आदेश दिले.
बोगस प्रमाणपत्र वाटप असो कि एम पी डबल्यू ची बोगस भरती असो या ना त्या कारणामुळे कायम चर्चेत असलेल्या बीड जिल्हा हिवताप कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या नावावर तब्बल 89 लाख रुपयांपेक्षा जास्तच रक्कम काढण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
यामध्ये आरोग्य कर्मचारी जीवन शाहूराव सानप याच्या नावावर 15 लाख 79 हजार 256 रुपये, हिवताप अधिकारी डॉ विजयसिंग शिंदे यांच्या नावावर 15 लाख 79 हजार 256 रुपये,आरोग्य निरीक्षक अशोक सुखदेव राख याच्या नावावर दोन वेळा वेगवेगळी बिले ज्याची रक्कम 14 लाख 86 हजार 472 आणि 14 लाख 10 हजार 851, आरोग्य कर्मचारी संजय धनोबा सानप याच्या नावावर 14 लाख 10 हजार 851 रुपये,आरोग्य निरीक्षक सुनील मोतीराम गायकवाड याच्या नावावर 14 लाख 86 हजार 472 रुपये अशी तब्बल 89 लाखापेक्षा अधिक रक्कम या कर्मचाऱ्यांना एरियर्स च्या नावाखाली वाटप करण्यात आली.
ही बाब उघडकीस आल्यानंतर लातूर च्या उपसंचालक यांनी डॉ विजयसिंग शिंदे यांना तात्काळ निलंबित केले आहे मात्र जीवन सानप, राख, संजय सानप, गायकवाड यांच्यावर कोणतीच कारवाई केलेली नाही.






Leave a Reply