News & View

ताज्या घडामोडी

30live ahir

उद्धव ठाकरेंना धक्का :सचिन अहिर यांना उपसभापती पदाची शिंदेकडून उमेदवारी!

मुंबई –राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. वरळी मतदार संघातून आदित्य ठाकरे यांच्यासाठी शिवसेनेत प्रवेश करणारे आणि नंतर विधानपरिषद पदरात पाडून घेणारे सचिन अहिर यांना विधानपरिषद उपसभापती पदाची उमेदवारी शिंदे यांनी दिली आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एक राजकीय भूकंप आला आहे. अहिर यांचा अर्ज भरण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती होती.

सचिन अहिर हे कामगारांचे नेते म्हणून ओळखले जातात. 1999 मध्ये त्यांनी शिवडी मतदारसंघातून प्रथमच आमदार म्हणून विजय मिळवला. त्यानंतर 2004 मध्ये पुन्हा त्याच मतदारसंघातून ते निवडून आले. पुढे 2009 मध्ये त्यांनी वरळी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांच्याकडे गृहनिर्माण राज्यमंत्रिपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली होती.

2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस सोडणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये सचिन अहिर यांचाही समावेश होता. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, आता तब्बल सात वर्षांनंतर त्यांनी ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाची आणि त्यावर उमटलेल्या संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेची राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.

जगन्नाथ अभ्यंकर हे विधान परिषदेसाठी शिवसेना ठाकरे गटाचे उपसभापतीचे उमेदवार असणार आहेत. या दोघांमध्येच प्रमुख लढत आहे. संख्याबळाचा विचार केला असता शिवसेना शिंदे गटाकडे संख्याबळ अधिक आहे. ही निवडणूक बिनविरोध होईल, असे सांगितले जात होते. मात्र, त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने मोठा डाव टाकला.

शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार एकनाथ शिंदे गटाने फोडले. ऑपरेशन टायगर राबवण्यात आले. आता खासदारांनंतर शिवसेना ठाकरे गटातील आमदारही फुटणार असल्याची चर्चा आहे. काही आमदारही एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. 6 खासदार ठाकरे गटाचे फोडून थेट मोठी खिंडार ठाकरे गटाला शिंदेंनी पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *