News & View

ताज्या घडामोडी

IMG 20260605 WA0018

भाजप लावणार प्रत्येक बूथवर पाच झाडं -जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांचा निर्धार!

पाटोदा-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला बारा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपच्या वतीने प्रत्येक बूथवर पाच वृक्षांची लागवड करण्याचा निर्धार जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी केला आहे. गहिनीनाथ गड येथे विठ्ठल महाराज यांच्या हस्ते वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी देशमुख यांनी एक पेड मा के नाम असा संदेश देत भाजप कार्यकर्त्यांनी वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धन करावे असे आवाहन केले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमाला व मंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत तसेच पंतप्रधानांच्या यशस्वी बारा वर्षांच्या लोककल्याणकारी कार्यकाळानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने बीड जिल्हाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून क्षेत्र गहिनीनाथ गड, ता. पाटोदा येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,लोकनेत्या ना. पंकजा मुंडे मा.खा. प्रीतम  मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात महंत विठ्ठल महाराज यांच्या शुभहस्ते भाजपा बीड जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांच्या उपस्थितीत सुमारे ५० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी अनुसूचित मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. वाल्मिक निकाळजे, माजी पंचायत समिती सभापती काकासाहेब लांबरुड, जिल्हा उपाध्यक्ष लालासाहेब कुमकर, मधुकर अनारसे, संदीप नागरगोजे, संतोष माळशिखरे, सरपंच मारुती सांगळे, सरपंच तात्या लाड प्रा. भरत गर्जे यांच्यासह अनेक मान्यवर, कार्यकर्ते, भाविक व पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.


भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी महंत विठ्ठल महाराज यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक बूथवर किमान पाच वृक्ष लावण्याचा संकल्प राबविण्यात आला असून जिल्हाभर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले असल्याचे सांगितले.


यावेळी उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणीय असंतुलन यावर मात करण्यासाठी वृक्षारोपण हा सर्वात प्रभावी उपाय असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम केवळ वृक्षारोपणापुरता मर्यादित नसून मातृप्रेम, संस्कार आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम आहे. आईप्रती कृतज्ञता व्यक्त करताना पृथ्वीमातेचे रक्षण करण्याचा संदेश या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या बारा वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानिमित्त आगामी काळात बीड जिल्ह्यात विविध जनजागृती, सेवा आणि विकासाभिमुख कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
“आज लावलेले एक झाड उद्याच्या पिढीचे जीवन वाचवू शकते. झाडे लावा, झाडे जगवा आणि पर्यावरण वाचवा,” असा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *