मुंबई -पशुसंवर्धन विभागाची मंत्री म्हणून काम करण्यात मला अतिशय आनंद आहे, ज्यांना व्यक्त होता येत नाही अशा मुक्या प्राणी, पशु पक्षांसाठी काम करण्याची संधी मला मिळाली यापेक्षा दुसरे समाधान काय असेल असं प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी येथे आज केलं.
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय गोरेगाव संकुल परिसरात जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून ५८ कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणा-या मल्टिस्पेशालिटी हाॅस्पीटलचे भूमीपूजन ना. पंकजाताई मुंडे आणि राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री तथा मुंबई उप नगर जिल्हयाचे पालकमंत्री ना. आशिष शेलार यांच्या हस्ते आज मोठया थाटात संपन्न झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
जोगेश्वरी पूर्व चे आ. अनंत नर, पशु विज्ञान विद्यापीठाचे कुलगूरू नितीन पाटील, अधिष्ठाता डाॅ शिरीष उपाध्ये, सहयोगी अधिष्ठाता डाॅ शैलेश इंगोले, भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानमूर्ती शर्मा, नगरसेवक जितेंद्र वळवी आदी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला विधीवत पूजन आणि कोनशिलेचे अनावरण करून नवीन हाॅस्पीटलच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी बोलताना पंकजाताई म्हणाल्या, आशिष शेलार यांचं मुक्या प्राण्यावरील प्रेम सर्वानाच माहित आहे, मी देखील प्राणी प्रेमी आहे. पालकमंत्री या नात्याने त्यांनी जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून ५८ कोटी रूपये दिले, त्यातून इथे पशुसांठी एक सुसज्ज मल्टिस्पेशालिटी हाॅस्पीटल उभं राहत आहे, याचं संपूर्ण श्रेय अर्थात शेलार यांचं आहे. आपल्याला केवळ हाॅस्पीटल उभारून चालणार नाही तर रिसर्च मध्ये मोठं काम करावे लागेल. पशुसंवर्धन विभागाची मंत्री म्हणून काम करताना मला अतिशय आनंद होतो, ज्यांना व्यक्त होता येत नाही, त्यांच्यासाठी काम करण्याची संधी मला मिळालेली आहे. माणसाच्या डॉक्टरपेक्षा प्राण्यांचा डाॅक्टर आशीर्वादाचा जास्त हक्कदार आहे. माणूस स्वतःची काळजी कशीही घेऊ शकेल पण मुक्या जीवाचे का? त्यांची काळजी आपल्यालाच घ्यावी लागेल. त्यांच्या अन्न, पाण्यासाठी सर्वांनी पुढे येऊन काम करावे.
या भागात प्राण्यांसाठी यापेक्षा आणखी जास्तीत जास्त सुविधा कशा मिळतील यासाठी मी व शेलार आम्ही दोघे मिळून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ असं सांगत विभागाला जास्तीत जास्त प्रगतीपथावर आणण्यासाठी भविष्यात माझे प्रयत्न असणार आहेत असं त्या म्हणाल्या.





Leave a Reply