बीड – बीडचे गटशिक्षणाधिकारी समंदर खान हे या नात्याकारणामुळे नेहमीच चर्चेत असतात या महाशयांनी दहावीच्या भरारी पथक आणि बैठे पथक नियुक्त करताना चक्क चार-पाच वर्षांपूर्वी मयत झालेल्या ग्रामसेवकाच्या नावाने ऑर्डर काढून आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. आता या कर्मचाऱ्याला ऑर्डर इशू करण्यासाठी समंदर खान हे स्वतः स्वर्गात जाणार की हाताखालच्या एखाद्या कर्मचाऱ्याला स्वर्गात पाठवून ऑर्डर इशू करणार अशी चर्चा सुरू झाली आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या नावाने ऑर्डर काढून आपला गलथानपणा दाखवून देणाऱ्या गटशिक्षणाधिकारी खान यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी होत आहे.
बीड जिल्हा प्रशासनामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही एकीकडे परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेले असताना दुसरीकडे बीडचे गटशिक्षणाधिकारी हे त्यांच्या दिवाळखोर बुद्धिमत्तेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
बीड जिल्ह्यात आणि सबंध राज्यात शुक्रवारपासून दहावीच्या परीक्षांना सुरुवात झाली. या परीक्षेमध्ये कॉपी सारखे गैरप्रकार होऊ नयेत म्हणून प्रशासनाच्या वतीने कडक पावले उचलून उपाययोजना करण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेच्या वेळी चौसाळा येथील एका महाविद्यालयात सामूहिक कॉफीचा प्रकार उघडकीस आला होता त्यानंतर या महाविद्यालयावर नेमणुकीस असलेल्या 16 शिक्षकांवर गुन्हे दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

दरम्यान बीड तालुक्यातील कुर्ला येथे चक्क परीक्षार्थींसाठी शाळेच्या इमारतीवर मंडप टाकण्याचा प्रकार उघडकेस आला. हे प्रकार कमी आहेत की काय म्हणून आता गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचा एक नवाच कारनामा समोर आला आहे. दहावीच्या परीक्षेमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून बैठे पथक आणि भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहे अशी माहिती न्यूज अँड व्ह्यूज ला सूत्रांनी दिली आहे.
गटशिक्षणाधिकारी समंदर खान यांनी बीड पंचायत समिती अंतर्गत असलेल्या ग्रामसेवक व इतर कर्मचाऱ्यांच्या नावाने बैठे पथक आणि भरारी पथक नियुक्त केले आहे. यामध्ये 2021 साली आजारपणामुळे मृत्युमुखी पडलेल्या ग्रामसेवक अरविंद आगलावे यांचे देखील नाव आल्याने आणि त्यांच्या नावाने ऑर्डर इशू झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एटी आगलावे यांच्यावर बैठे पथकाची जबाबदारी दिली गेली असून जेवढ्या कर्मचाऱ्यांच्या नावाने हे आदेश पारित झाले आहेत त्यात पाच वर्षांपूर्वी निधन झालेल्या ग्रामसेवक आगलावे यांचे नाव आल्याने गटशिक्षणाधिकारी यांनी नशा पाणी करून या ऑर्डर काढल्या की काय अशी चर्चा होऊ लागली आहे.
एखादा शासकीय कर्मचारी मयत झाल्यानंतर त्याच्या नावाने प्रशासकीय कामकाजाची ऑर्डर काढण्याचा हा प्रकार म्हणजे गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचा भोंगळपणा उघड करणारा आहे. या ऑर्डरमुळे आता आगलावे कुटुंबाला जो मनस्ताप झाला आहे त्याची भरपाई कोण करणार अशी चर्चा असून समंदर खान हे स्वतः अरविंद आगलावे यांना स्वर्गात जाऊन ऑर्डर इशू करणार का अशी देखील चर्चा सुरू झाली आहे.
प्रशासकीय कामकाजात ढिसाळपणा करून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षणाधिकारी आणि संपूर्ण प्रशासनाची अब्रूवेशीला टांगणाऱ्या गटशिक्षणाधिकारी समंदर खान यांच्यावर कार्यालयीन कामकाजात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवून निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे.





Leave a Reply