बीड-जिल्ह्यातील शाळांची झाडाझडीत घेण्यास एसआयटीने सुरूवात केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील आठ शाळांच्या तपासणीसाठी माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांनी समिती नेमली आहे. विशेष म्हणजे या तपासणीमधून बीड जिल्ह्यातील बोगस शिक्षक व कोट्यवधींचा थकित वेतन घोटाळा उघड होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
जिल्ह्यातील खासगी शाळातील अनेक घोटाळे उघडकीस आलेले आहेत. बोगसपणे केलेली शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची भरती,शालार्थ आयडी यासह अन्य गोष्टी सरकार दरबारी उघडकीस आलेल्या आहेत. यासदर्भात मूळ तक्रारदार भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्षसादेक इनामदार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री तसेच एसआयटीकडे लेखी तक्रार केलेली आहे. त्यांच्या याच तक्रारीची दखल घेवून एसआयटीचे सदस्य सचिव तथा पुण्याच्या शिक्षण सहसंचालकांनी बीड जिल्ह्यातील शाळांची तपासणी करण्याचे आदेश छ. संभाजीनगरच्या शिक्षण उप संचालकांना दिलेले आहेत. पुढे या पत्रानुसार तात्काळ कारवाई करावी, अशा सुचना यावेळी शिक्षण उपसंचालकांनी बीडच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारीप्रियाराणी पाटील यांना दिल्या आहेत.
त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनीही आपल्या अध्यक्षतेखाली तात्काळ यासंदर्भात एक चौकशी समिती गठीत केली आहे. या समितीमध्ये सचिव म्हणून माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी विपूल भागवत तर सदस्य म्हणून प्रभारी उपशिक्षणाधिकारी एन. जे. हजारे, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक राजेश खटावकर आणि माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक अजय बहीर यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार परळी येथील वैद्यनाथ विद्यालय, सरस्वती विद्यालय, वडवणी येथील माध्यमिक विद्यालय, दिंद्रुड येथील माध्यमिक विद्यालय, टाकरवण येथील माध्यमिक विद्यालय, वाहेगाव आमला (ता. अंबाजोगाई) येथील श्रीहरी विद्यालय, अंबाजोगाई येथील वेणुताई चव्हाण कन्या विद्यालय आणि घाटनांदूर येथील शंकर विद्यालयाची चौकशी केली जाणार आहे. तसेच या शाळांची चौकशी झाल्यानंतर आवश्यक ते अभिलेखे व पुराव्यासह तात्काळ तीन दिवसांच्या आत याचा अहवाल शिक्षण उपसंचालकांना सादर केला जाणार आहे. तर हा अहवाल प्राप्त होताच शिक्षण उपसंचालकही तो अहवाल एसआयटीला सादर करणार आहेत. त्यामुळेच बीड जिल्ह्यातील बोगस शिक्षक भरती घोटाळा व थकीत वेतन घोटाळा करणारे संस्थाचालक व बीड जिल्ह्यातील अधिकारी व शालार्थ आयडी देणारे उपसंचालक शिक्षण विभाग कार्यालयातील अधिकारी या चौकशीनंतर लवकरच जाळ्यामध्ये अडकणार आहेत याकडे पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.












Leave a Reply