बीड – नागपूर बोगस शिक्षक भरती प्रकरणी आष्टीच्या माजी गटशिक्षणाधिकारी वैशाली जामदार यांना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. जामदार यांच्या अटकेमुळे बीडच्या भरतीची देखील चौकशी रडारवर आली आहे.
नागपूरमध्ये शिक्षक भरती आणि ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा तपास वेगाने सुरू असून या प्रकरणात अटकसत्र वाढत आहे. राज्यभर खळबळ उडवणाऱ्या या घोटाळ्यात आतापर्यंत काही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. उल्हास नरडसह काहींना जामीन मंजूर झाल्यानंतर आता निवृत्त उपसंचालक अनिल पारधी यांनाही जामीन मिळाला आहे.
या घोटाळ्यात बनावट शालार्थ आयडी तयार करून वेतनास पात्र नसलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आले होते. या आरोपाखाली वेतन अधीक्षक नीलेरा वाघमारे यांचे निलंबन करण्यात आले असले तरी, चौकशी अहवालात त्यांचे नाव आरोपींमध्ये आढळूनही त्यांना अटक करण्यात आलेली नाही.
याशिवाय, खोटी नियुक्तीपत्रे, बनावट पदोन्नती, शिक्षकांना बोगस मान्यता आणि शासनाची दिशाभूल केल्याच्या आरोपाखाली नागपूर विभागीय माजी उपसंचालक वैशाली जामदार यांना चौकशी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, त्यांच्यावर कारवाई झाली नव्हती. अखेर शुक्रवारी त्यांना अटक करण्यात आली, आणि त्यामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
वैशाली जामदार या दहा वर्षांपूर्वी आष्टी येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्या काळात त्यांनी बीड जिल्ह्यातील अनेक संस्थाचालकांना देखील बोगस शिक्षक भरती प्रकरणात मदत केली होती. त्यांना अटक झाल्याने बीड जिल्ह्यातील अनेक संस्थाचालकांचे धाबे दनाणले आहेत.
राज्यभर चर्चेत असलेल्या या घोटाळ्याची चौकशी समितीचे अध्यक्ष राहिलेले विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांनाही गुरुवारी रात्री अटक करण्यात आली. २०१९ पासून गैरमार्गाने शालार्थ आयडी तयार करून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अदा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
यापूर्वी, नागपूर उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी रवींद्र पाटील यांनी पोलिसांकडे या घोटाळ्याची तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीच्या आधारे शिक्षण विभागाने मोठ्या प्रमाणावर चौकशी करून संशयित शिक्षक, मुख्याध्यापक, लिपिक आणि शिपाई यांची यादी तयार केली होती. त्यानंतर शिक्षण आयुक्तांनी या अहवालाच्या आधारे कठोर भूमिका घेत तपास अधिक तीव्र केला.
या घोटाळ्यात अजूनही नवीन अटक होण्याची शक्यता असून, शिक्षण क्षेत्रातील अनेक अधिकारी चिंतेत आहेत. पुढील काही दिवसांत आणखी काही मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.
Leave a Reply