नागपूर -नागपूर विभागात उघडकीस आलेल्या शिक्षक भरती घोटाळ्यात आता सक्त वसुली सांचालनालय अर्थात ईडी ची एन्ट्री झाली आहे. हजारो कोटी रुपयांच्या या घोटाळ्याचा तपास करण्यासाठी सरकारी एस आय टी ची स्थापना करण्याचा विचार करत आहे. अशावेळी ईडी ची एन्ट्री झाल्याने संस्थाचालक यांचे धाबे दनाणले आहेत.
नागपूर जिल्ह्यात बोगस शालार्थ आय डी च्या माध्यमातून तब्बल 580 शिक्षकांची भरती झाल्याचे प्रकरण मागील महिन्यात उघडकीस आले. या प्रकरणात आतापर्यंत शिक्षण उपसंचालक यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षकांना अटक झाली आहे. या सगळ्या घोटाळ्याचे कनेक्शन मंत्रालयपर्यंत पोहचत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एस आय टी स्थापन करण्याबाबत सकारात्मक पावले उचलली आहेत.
या घोटाळ्याचा सखोल तपास नागपूर सायबर पोलिसांकडून सुरू आहे. एनआयसी आणि महाआयटीच्या सर्वरकडून आवश्यक माहिती मागवण्यात आली आहे. दरम्यान, राज्य सरकारने देखील एसआयटी स्थापन करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. राज्यभर या घोटाळ्याची मोठी चर्चा सुरु असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी वाढत आहे.
नागपूर जिल्ह्यात उघडकीस आलेल्या या घोटाळ्यात तब्बल 580 शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची बनावट पद्धतीने नियुक्ती झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बनावट शालार्थ आयडीचा वापर करून कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. एका नियुक्तीच्या बदल्यात 20 ते 35 लाख रुपये घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या घोटाळ्यात वापरलेले संगणक, लॅपटॉप, मोबाईल डिव्हाइसेस आणि विविध आयपी ऍड्रेसचा तपास करण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपींच्या बँक खात्यांचा तपशील मागवला असून, वेतनाच्या व्यवहारांचीही चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे बोगस शिक्षकांना पगार मिळाल्याचे सर्व पुरावे आता गोळा केले जात आहेत.
या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यांनी मागणी केली आहे की, दोषी संस्थाचालकांवर कठोर कारवाई व्हावी, परंतु निरपराध व्यक्तींना त्रास होऊ नये. ईडी, एसआयटी किंवा निवृत्त न्यायाधीशांमार्फत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे आणि दोषींवर कठोर कारवाईचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात या घोटाळ्यात अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आता या घोटाळ्याचा तपास करण्यासाठी ईडी ने पुढाकार घेतल्याने संस्थाचालक, संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि भरती झालेले बोगस शिक्षक यांची पाचावर धारण बसली आहे.
Leave a Reply