News & View

ताज्या घडामोडी

कासलेची फेकाफेकी उघड!निवडणूक विभागाकडून गुन्हा दाखल!

बीड – वादग्रस्त व सध्या सेवेतून बडतर्फ करण्यात आलेला पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याचे परळी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने व्हिडिओ द्वारे प्रसारित केलेले आरोप खोटारडे, जनतेची दिशाभूल करणारे तसेच निवडणूक आयोगावर शंका उपस्थित करणारे असून त्यात कोणतेही तथ्य नाही; रणजित कासले याला संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत, स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षित, ईव्हीएम मशीन सुरक्षा किंवा मतमोजणी प्रक्रिया यापैकी कुठेही परळी मतदारसंघात ड्युटी देण्यात आलेली नव्हती, तो बीड सायबर विभागात नियुक्त होता, असा स्वयंस्पष्ट खुलासा राज्य निवडणूक आयोगाने अधिकृतरित्या घोषित केला आहे.

निवडणूक प्रक्रियेत स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम मशीन ठेवलेल्या ठिकाणी आपली ड्युटी होती व तिथे ईव्हीएम मशीन सोबत छेडछाड करता यावी, यासाठी आपल्याला दहा लाख रुपये देण्यात आल्याचा बोगस आरोप रणजित कासले याने सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करून केला होता. त्याची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने बीड जिल्हा प्रशासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते, त्यानंतर जिल्हाधिकारी बीड यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या मार्फत रणजित कासले बाबत अहवाल मागवला असता रणजित कासले हा त्या काळी बीड सायबर विभागात नियुक्त होता, त्याची ड्युटी परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रियेत कुठेही नेमण्यात आली नव्हती, असे अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने प्रसिध्दी पत्रकान्वये जाहीर केले आहे.

विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन सील करताना सर्वपक्षीय उमेदवारांचे प्रतिनिधी तसेच निवडणूक निरीक्षक उपस्थित होते. ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवल्या ती जागा 24 तास सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणी खाली होती. त्या ठिकाणी तीन स्तरीय सुरक्षा तैनात करण्यात आली होती, ज्यामध्ये ईव्हीएम मशीनच्या सर्वात जवळ केंद्रीय पोलीस दलाचे अधिकारी कर्मचारी, इमारतीच्या परिघावर राज्य राखीव पोलीस दलाचे जवान, इमारतीच्या बाहेर जिल्हा पोलीस दलाचे कर्मचारी नियुक्त होते. तसेच ईव्हीएम मशीनच्या टेंपरिंग बाबत कोणतीही तक्रार कुठल्याही राजकीय पक्षाने केलेली नाही, रणजीत कासलेचा या प्रक्रियेशी कोणताही संबंध येत नाही.

बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले याने केलेले आरोप निराधार तथ्यही दिशाभूल करणारे तसेच लोकशाहीच्या सर्वात महत्त्वाच्या असलेल्या निवडणूक प्रक्रियेवर नाहक संशय निर्माण करणारे व गंभीर असल्याचे देखील निवडणूक आयोगाने आपल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. तसेच सदर निवडणूक प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शक शांततेत आणि सुरक्षित पार पडल्याचे सुद्धा निवडणूक आयोगाने स्पष्टपणे नमूद केले आहे.

रणजीत कासले याने आपल्या खात्यावर आलेल्या दहा लाख रुपयांबाबत जी माहिती दिली होती, ही माहिती देखील खोटी असल्याचे उघड झाले असून सदर पैसे त्याने सुदर्शन काळे नामक अंबाजोगाई येथील एका व्यावसायिकाकडून उसने घेतले होते तसेच त्यातील अडीच लाख रुपये अजूनही परत केले नसल्याची तक्रार स्वतः सुदर्शन काळे यांनी बीड जिल्हा पोलीस दलाकडे केली आहे.

मात्र रणजीत कासले याने वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून केलेल्या आरोपांचा आधार घेत परळीच्या निवडणूक प्रक्रियेवर विविध आरोप करणारे राजकीय पुढारी मात्र चांगलेच तोंडघशी पडले आहेत. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार परळी तहसीलच्या निवडणूक विभागाने रणजीत कासले यांच्या विरोधात परळी पोलिसात फिर्याद दिली असून रणजीत कासले याच्यावर विविध कलमांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *