बीड -महाराष्ट्र सह इतर राज्यात तब्बल 53 शाखाच्या माध्यमातून अब्जावधी रुपयांच्या ठेवी गोळा करून वेळेवर परत न करता ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट मधील ठेवी लवकरच मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुरेश कुटे यांच्या मालमत्ता विक्रीबाबत कारवाई ला परवानगी देण्याची मागणी केली असून ही परवानगी मिळाल्यास येत्या काही महिन्यात ठेवी परत मिळण्याची प्रक्रिया सुरु होऊ शकते.
ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार सुरेश कुटे यांची मागील महिन्यात ईडी कडून कसून चौकशी करण्यात आल्यानंतर ज्ञानराधा मल्टीस्टेटचे मालमत्तांचा एमपीआयडीचा प्रस्ताव मुंबईला पाठवण्यात आलाय. हा प्रस्ताव पुढे गृहमंत्रालयात गेल्यानंतर मालमत्ता विक्रीला मंजुरी मिळणार आहे. याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेकडून प्राप्त झाली आहे. गेल्या वर्षभरापासून मल्टीस्टेट बंद असल्याल्या या पतसंस्थेतील गुंतवणूकदारांचे पैसे अडकलेले आहेत. ज्ञानराधाच्या स्थावर मालमत्तांना विक्रीची मंजूरी मिळणार असल्याने ठेवीदारांचे पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
ज्ञानराधा मल्टीस्टेटचे चेअरमन व्हॉइस चेअरमन आणि संचालक मंडळाच्या नावावर असलेल्या 80 स्थावर मालमत्तांचा एमपीआयडी अंतर्गत प्रस्ताव मुंबई येथे अप्पर पोलीस महासंचालकांकडे पाठविण्यात आला. गृह मंत्रालयाकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यावर 80 मालमत्तांचा लिलाव करण्यासंदर्भात अधिसूचना निघेल. त्या अधिसूचनेमध्ये येणाऱ्या मालमत्ता जिल्हाधिकाऱ्यांना लिलावाद्वारे विकता येणार आहे. लिलावातून मिळणाऱ्या पैशातून ठेवेदारांना त्यांचे पैसे परत मिळण्यास मदत होईल.
ज्ञानराधा मधील ठेवीदार यांच्या ठेवी परत देण्याबाबत आणि चौकशी बाबत जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांची अवसायक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जाधव यांनी जालना रोड शाखेमार्फत अर्ज घेण्यास सुरवात केली आहे. मात्र या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता ग्राहकांनी आणि ठेवीदारांनी मेलवर अर्ज पाठवावेत असे आवाहन जाधव यांनी केले आहे.
मराठवाड्यात लाखो ठेवीदारांना आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवत ज्ञानराधा मल्टीस्टेटने 636 कोटी 26 लाख रुपयांची फसवणूक झाल्याच्या अनेक ग्राहकांच्या तक्रारी आहेत. जिल्ह्यातील 23 शाखेतील स्थावर आणि जंगम मालमत्ता आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केली आहे. बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टीस्टेटचे राज्यात व राज्याबाहेर जाळे पसरलेले आहे. गेल्या वर्षभरापासून मल्टीस्टेट बंद असल्याने गुंतवणूकदारांचे पैसे अडकलेले आहेत. या मल्टीस्टेट घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार सुरेश कुटे यांची मागील महिन्यात ईडी कडून कसून चौकशी करण्यात आल्यानंतर व केंद्र सरकारने दिलेल्या निर्णयानंतर बीड, छत्रपती संभाजी नगर पुणे व मुंबई या शाखांमधील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आता या जप्त केलेल्या संपत्तीचा लिलाव होण्याचा मार्ग मोकळा झाला असून ज्ञानराधाच्या 80 मालमत्तांचा एमपीआयडी प्रस्ताव मुंबईला पाठवण्यात आला असून स्थावर संपत्तीच्या विक्रीला परवानगी मिळणार आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर या संपत्तीच्या लिलावातून ठेवीदारांचे पैसे मिळण्यास मदत होणार आहे.
Leave a Reply