बीड -जिल्हा कारागृहाची संरक्षक भिंत पाडून रस्ता करण्यात आला आहे. हा अनधिकृत प्रकार असताना कारागृह अधीक्षक यांचे मात्र त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होतं असल्याचे दिसत आहे. यामुळे बंदिवान कैद्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
बीड शहरातील नगर रोड भागात जिल्हा कारागृह आहे. या ठिकाणी विविध गुन्ह्यातील तीनशे पेक्षा अधिक कैदी आहेत. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर आहे. मात्र ही सुरक्षा भगवान भरोसे असल्याचे चित्र आहे.
जिल्हा कारागृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूने संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. ही संरक्षक भिंत पंधरा ते वीस फूट पाडून रस्ता करण्यात आला आहे . एसपी ऑफिस समोर असलेल्या कॉलनीत पे युनिट, कृषी भवन, एस बी आय बँक अशी कार्यालये आहेत.
या कार्यालयाला जाण्यासाठी जो रस्ता आहे तो कारागृह अर्थात जेलच्या बाजूने मोकळा करण्यात आला आहे. या ठिकाणी असलेली कंपाउंड वाल पाडून रस्ता करण्यात आला आहे. एखादेवेळी कारागृहात काही अघटित घटना घडली अन कैद्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला तर या पाडलेल्या भिंतीमुळे जो रस्ता तयार झाला आहे तेथून हे कैदी फरार होऊ शकतात.
वास्तविक पाहता जेलच्या आजूबाजूला दोन तीन मजली इमारती बांधण्यास देखील परवानगी नसते. असे असताना ही कंपाउंड वाल कसकाय आणि कोणी पाडली याकडे कारागृह अधीक्षक यांनी का लक्ष दिले नाही अशी चर्चा सुरु झाली आहे.
Leave a Reply