बीड -अवादा कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी वाल्मिक कराड यांनी मागितल्याची कबुली कोठडीत असलेल्या विष्णू चाटे याने दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.त्यामुळेच त्याचे व्हॉइस सॅम्पल तपासण्यासाठी वेळ लागेल असा युक्तिवाद सी आय डी ने केल्याने चौदा दिवस कोठडीत रवानगी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. चाटेच्या कबुलीमुळे कराड चा पाय आणखी खोलात गेला आहे.
अटकेत असलेल्या आरोपी विष्णू चाटे यानं वाल्मिक कराडबाबत मोठी कबुली दिली आहे. वाल्मिक कराडने पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधला होता, अशी माहिती चाटे याने सीआयडी तपासात दिली आहे. याबाबतचा अहवाल सीआयडीने न्यायालयात अहवाल सादर केला आहे. त्यामुळे खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या आहेत.
याच प्रकरणातून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. त्यामुळे यातही वाल्मिक कराडचं कनेक्शन बाहेर येण्याची शक्यता आहे. आतापर्यंत वाल्मिक कराड याच्यावर केवळ खंडणी मागितल्याचा आरोप होता. त्याच्याविरोधात कोणताही पुरावा नव्हता, पण आता याबाबतची कबुली अटकेतील आरोपी विष्णू चाटेनं दिल्याने वाल्मिक कराडच्या अडचणींत वाढ झाली आहे
वाल्मिक कराडसह विष्णू चाटे आणि इतर आरोपींविरोधात पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांना दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. कंपनीचे मॅनेजर शिंदे यांनी याबाबतची तक्रार दिली होती. त्यांनी वाल्मिक कराडने आपल्या फोनवरून खंडणीसाठी धमकी दिल्याचा दावा केला होता. आता कंपनीच्या मॅनेजरनं केलेल्या तक्रारीला विष्णू चाटेच्या कबुलीमुळे दुजारा मिळत आहे. त्यामुळे वाल्मिक कराडचे पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.
Leave a Reply