News & View

ताज्या घडामोडी

चारच महिन्यात उचलबांगडी!बारगळ यांचं नेमकं काय चुकलं!

बीड -राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यात बिघडलेल्या कायदा आणि सुव्यस्थेला जबाबदार धरून एसपी अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली केली. अवघ्या चार महिन्यापूर्वी जॉईन झालेल्या बारगळ यांचं नेमकं चुकलं काय अशी चर्चा आता होऊ लागली आहे. जिल्ह्यात खोटे गुन्हे दाखल करणे, खंडणी, खून, मोकाट वाळू माफिया आणि वाढता राजकीय हस्तक्षेप त्यांच्या उचलबांगडी ला कारणीभूत असल्याची चर्चा होऊ लागली आहे.

ऑगस्ट 2024 मध्ये बीड येथे बदली होऊन आलेले एसपी अविनाश बारगळ हे शांत, शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. मात्र बीड जिल्ह्यात आल्यापासून त्यांच्याकडून कायदा आणि सुव्यस्था अबाधित राहण्यासाठी कडक पाऊले उचलली गेली नाहीत.

चार महिन्याच्या काळात पवनचक्की कंपन्याना दिल्या गेलेल्या धमक्या असोत कि खुणाचे प्रकार. वाळू माफिया, गुटखा माफिया, भू माफिया यांचे प्रस्थ वाढत गेले. विधानसभा निवडणूक शांततेत पार पडली. मात्र त्यानंतर जिल्ह्यात मस्साजोग येथील खुनाची घटना समोर आली.

त्या अगोदर रामकृष्ण बांगर, सत्यभामा बांगर आणि बाळा बांगर यांच्यावर खोटे गुन्हे पोलिसांनी दाखल केले. तसेच परळी येथील डॉ देशमुख यांच्यावर देखील खोटी ऍट्रॉसिटी ची केस दाखल झाली. बांगर कुटुंब हे घरी असताना आणि त्यांचा मुलगा राज्यबाहेर असताना पोलिसांनी कोणाच्या तरी राजकीय दबावाखाली गुन्हे दाखल केले.

एवढेच नाही तर त्यांना अटक करण्यासाठी देखील पोलीस अधीक्षक यांनी त्यांच्या पथकातील लोकांवर जिम्मेदारी दिली. वास्तविक पाहता या खोट्या केसेस आहेत हे माहित असूनही त्यांनी जाणीवपूर्वक राजकारणी मंडळींच्या म्हणण्यावर हा प्रकार केल्याचे आरोप झाले.

त्यानंतर मस्साजोग प्रकरणी त्यांच्या यंत्रणेने गुन्हे दाखल करण्यासाठी उशीर केला. बीड जिल्ह्याच्या पोलीस दलाचा कारभार परळीवरून वाल्मिक कराड चालवत असल्याचे बोलले जाऊ लागले.

या सगळ्या विषयाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहचली. त्यामुळे अवघ्या चार महिन्यापूर्वी रुजू झालेल्या एका चांगल्या अधिकाऱ्यावर गंडातर आले अशी चर्चा होऊ लागली आहे.

बीड जिल्ह्यात कोणत्याही पोलीस अथवा महसूल किंवा इतर विभागात रुजू व्हायचे असल्यास परळी ला जाऊन टोल भरावा लागतो अशी चर्चा आहे. अनेक पोलीस अधिकारी हे तर परळीच्या तालावर नाचतात असे आरोप अनेकवेळा झाले. त्यामुळे बारगळ यांच्यानंतर आता अशा पोलीस अधिकाऱ्यांची देखील लवकरच उचलबांगडी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे माल देऊन क्रीम पोस्टिंग घेतलेल्या अधिकाऱ्यांचे धाबे दनाणले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *